– महानगरपालिकाअंतर्गत विविध विकासकामांचा शुभारंभ
– पूरनियंत्रणासाठी 3 हजार 200 कोटींचा निधी
कोल्हापूर, दि. 9 (जि. मा. का.) : कोल्हापूरच्या पूरनियंत्रणासाठीच्या निधीची प्रलंबित मागणी पूर्ण केली असून, त्यासाठी तीन हजार 200 कोटींचा निधी मंजूर केला आहे. या माध्यमातून पुराचे संकट कायमस्वरूपी दूर करण्यासाठी प्रयत्न केले. कोल्हापूरच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, या माध्यमातून विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत विविध विकासकामांच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.
दसरा चौक येथे झालेल्या या कार्यक्रमास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. आदि यावेळी उपस्थित होते.
छत्रपती शाहु महाराजांच्या भूमीत सामाजिक क्रांतीची बीजे रोवली गेली. शिक्षण, सहकार आदिंची मुहुर्तमेढ रोवली गेली. कोल्हापूरची उद्योगनगरी म्हणून ओळख असून, खऱ्या अर्थाने कोल्हापूरचे नाव जगाच्या नकाशावर आणण्यासाठी काम करत आहोत, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कोल्हापूर येथे कन्वेंशन सेंटर उभारण्यासाठी 277 कोटी रूपये निधी मंजूर केला आहे. अमृत 2.0 योजना पहिल्या टप्प्यासाठी 152 कोटी, अमृत 2.0 योजनेच्या दुसरा टप्प्यासाठी 139 कोटी, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणी व संवर्धन करण्यासाठी 25 कोटी अशा माध्यमातून कोल्हापूरचे विकासप्रकल्प पुढे नेत आहोत, असे ते म्हणाले.
कोल्हापूरला मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ होण्यासाठी पाठपुरावा करत असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर महानगरपालिकेतील वर्षानुवर्षे रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याच्या सूचना यावेळी महापालिका प्रशासनास केल्या.
उपस्थित महिलांना नवरात्रीच्या, आगामी दसरा, दिवाळीच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कोल्हापूरच्या महापुरावेळी आपण आलो होतो. त्यावेळी कोल्हापूरकरांचे मुक्या प्राण्यांबद्दलचे प्रेम, जिव्हाळा पाहिला. इथल्या मातीत प्रेमाचा ओलावा आहे. त्यावेळी आरोग्यमंत्री या नात्याने साथीचे रोग पसरू नये, यासाठी वेळीच उपाययोजना केल्या होत्या. तसेच, अन्नधान्य, चारा, पाणी आदि सर्व आवश्यक गरजा पूर्ण केल्या होत्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, विकासाबरोबरच कल्याणकारी योजनाही राज्य शासन राबवत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून 2 कोटी 30 लाख महिलांच्या खात्यात 17 हजार कोटी रूपये जमा करण्यात आले आहेत. ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार असून या योजनेचे आतापर्यंत पाच हप्ते दिले आहेत. ऑक्टोबर व आगामी नोव्हेंबर महिन्याचा हप्ताही आचारसंहितेपूर्वी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. या माध्यमातून अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. आता महिलांना लखपती करण्याचे आपले ध्येय असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शासन आपल्या दारी योजनेतून 5 कोटीहून अधिक लोकांनी लाभ घेतले. मुख्यमंत्री युवा कार्य योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुलींना मोफत व्यावसायिक उच्च शिक्षण योजना, लेक लाडकी, बसप्रवासात सवलत अशा अनेक योजनांच्या अंमलबजावणीतून समाजातील सर्व गरजू घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूरसाठी भरीव प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. तसेच, 2019 च्या पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या मदतीचे स्मरण केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महालक्ष्मीची प्रतिकृती देऊन स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन विश्वराज जोशी यांनी केले. कार्यक्रमास शहरातील महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकास कामांचा तपशील
कोल्हापूरच्या विकासासाठी जवळपास चार हजार कोटींच्या विकास कामांचा यावेळी शुभारंभ करण्यात आला. ती पुढीलप्रमाणे – कोल्हापूर सांगली जिल्हा पूरनियंत्रण करणे – 3 हजार 200 कोटी, आंतराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर उभारणे – 277 कोटी, अमृत 2.0 योजना पहिला टप्पा – 152 कोटी, अमृत 2.0 योजना दुसरा टप्पा – 139 कोटी, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणी व संवर्धन करणे – 25 कोटी, कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधा पुरविणे – 25 कोटी, पंचगंगा नदी घाट सुशोभिकरण करणे – 3 कोटी 50 लक्ष, पंचगंगा नदी घाट येथे विविध विकासकामे करणे – 2 कोटी 50 लक्ष, गांधी मैदान येथे स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज लाईन टाकणे – 5 कोटी, कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील विविध भागांमध्ये रस्ते डांबरीकरण करणे – 7 कोटी, शहरात ठिकठिकाणी हेरिटेज लाईट बसविणे – 1 कोटी 50 लक्ष, रंकाळा तलाव येथे म्युझिकल फाऊंटेन उभारणे – 5 कोटी, रंकाळा तलाव येथे आकर्षक विद्युत रोषणाई करणे – 3 कोटी 31 लक्ष, रंकाळा तलाव येथे मिनिचर पार्क तयार करणे – 3 कोटी 50 लक्ष, पंचगंगा स्मशानभूमी दुरुस्ती करणे नुतनीकरण करणे – 3 कोटी 50 लक्ष,
सिध्दार्थनगर येथे पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी 2 कोटी 74 लक्ष, अंबाबाई महालक्ष्मी मंदिर परिसराअंतर्गत म्युझिकल हेरिटेज स्ट्रीट लाईट बसविण्यासाठी 2 कोटी 50 लक्ष, छत्रपती शिवाजी स्टेडिअम सपाटीकरण करण्यासाठी 2 कोटी, हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे विरंगुळा उद्यान तयार करण्यासाठी 5 कोटी, कोल्हापूर महानगरपालिका प्र. क्र. 31 बाजारगेट अंतर्गत श्री निरंजन संस्था तालीम मठ येथे धर्मवीर आनंद दिघे कुस्ती संकुल विकसित करण्यासाठी 3 कोटी.
कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील विविध गार्डनमध्ये बैठक व्यवस्था (बेंचेस) बसविण्यासाठी 4 कोटी 50 लक्ष, कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील विविध प्रभागांमध्ये ओपन जिम व उद्यानामध्ये व्यायामाचे साहित्य बसविण्यासाठी 5 कोटी, कोल्हापूर शहरात ओला, सुका, घरगुती घातक कचरा आणि सॅनिटरी कचरा वर्गीकरणासाठी ठिकठिकाणी वेट आणि ड्राय गारबेज कलेक्टर बसविण्यासाठी 2 कोटी 50 लक्ष.
कोल्हापूर महानगरपालिका प्र.क्र. 1 शुगरमिल अंतर्गत कसबा बावडा येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक विकसित करण्यासाठी 1 कोटी 50 लक्ष, कोल्हापूर महानगरपालिका प्र. क्र. 56 मधील म.न.पा.चे. रि.स. नं 462 येथील (ओपन स्पेस) संभाजीनगर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उद्यान विकसित करण्यासाठी 1 कोटी 50 लक्ष. शाहू उद्यान विकसित व सुशोभिकरण करण्यासाठी 1 कोटी, कोल्हापूर शहरातील कसबा बावडा येथील हनुमान तलावाचे संवर्धन करण्यासाठी 3 कोटी 30 लक्ष.