अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ देण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या योजनेचा जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, यासाठी या योजनेची माहिती देणारा हा लेख
नवीन सिंचन विहीरीसाठी चार लाख रुपये अनुदान मर्यादा आहे.जुनी विहीर दुरूस्तीसाठी एक लाख रुपये अनुदान मर्यादा आहे. शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी अनुदान मर्यादा प्रचलित आर्थिक मापदंड व शेततळ्याचे आकारमानानुसार परिगणित होणाऱ्या रकमेच्या किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% किंवा रू.2 लाख यापैकी जे कमी असेल ते. इनवेल बोअरिंगसाठी चाळीस हजार रुपये अनुदान मर्यादा आहे.वीज जोडणी आकार 20,000 किंवा प्रत्यक्ष भरलेला आकार यापैकी जे कमी असेल ते. विद्युत पंपसंच/डिझेल इंजिन (नवीन बाब) साठी 10 अश्वशक्ती क्षमतेपर्यंत पंपसंचाकरिता प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या 90% किंवा रू. 40,000 यापैकी जे कमी असेल ते. सोलार पंप (वीज जोडणी आकार व पंपसंच ऐवजी) प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या 90% किंवा रू. 50,000 यापैकी जे कमी असेल ते. एचडीपीई/ पीव्हीसी पाईप (नवीन बाब) प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या 100% किंवा रू. 50,000 यापैकी जे कमी असेल ते.
सुक्ष्म सिंचन संच मध्ये तुषार सिंचन संचासाठी प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% किंवा रू.47,000/- अनुदान यापैकी जे कमी असेल ती अनुदान मर्यादा आहे. ठिबक सिंचन संचासाठी प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% किंवा रू.97,000/- अनुदान यापैकी जे कमी असेल ते. तुषार सिंचन संच पुरक अनुदान प्रति थेंब अधिक पीक योजनेंतर्गत (1) अल्प /अत्यल्प भूधारकांसाठी 55% + मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून 25% + डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेतून 10% तसेच (2) बहू भूधारकांसाठी 45% + मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून 30% + डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेतून 15% किंवा रू. 47,000/- यापैकी जे कमी असेल ते (एकूण 90% अनुदान मर्यादेत).ठिबक सिंचन संच पुरक अनुदान प्रति थेंब अधिक पीक योजनेंतर्गत (1) अल्प /अत्यल्प भूधारकांसाठी 55% + मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून 25% + डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेतून 10% तसेच (2) बहू भूधारकांसाठी 45% + मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून 30% + डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेतून 15% किंवा रू. 97,000/- यापैकी जे कमी असेल ते (एकूण 90% अनुदान मर्यादेत). यंत्रसामुग्री (बैलचलित/ ट्रॅक्टर चलित अवजारे)(नवीन बाब) 50,000 रुपये आणि परसबाग (नवीन बाब) 5,000 रुपये असे आहे.
या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.नवीन विहीरीबाबत रू. 4 लाख अनुदान मर्यादेपर्यंत विहीरीची खोली असावी, 12 मीटर खोलीची अट रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र भूजल (पिण्याच्या पाण्यासाठी विनियमन) अधिनियम 1993 च्या कलम 3 नुसार अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या 500 मीटर परिसरात नवीन विहिर घेण्यास प्रतिबंध घालण्यात आलेले आहेत. त्यामुळे अस्तित्वातील पेयजल स्त्रोताच्या 500 मीटर परिसरात सिंचन विहिर अनुज्ञेय करु नये, यास मान्यता देण्यात आली आहे. दोन सिंचन विहिरींमधील 500 फूट अंतराची अट रद्द करण्यात आली आहे.नवीन विहीर या घटकाचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यास 20 वर्षानंतर जुनी विहीर दुरुस्ती या घटकाचा लाभ देण्यात यावा.
शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण या घटकाचा लाभ मागेल त्याला शेततळे या योजनेबरोबरच इतर योजनेंतर्गत शेततळ्याचा लाभ घेण्यात आलेल्या तसेच स्वखर्चाने शेततळे केलेल्या शेतक-यांना देखील देण्याची तरतूद अनुज्ञेय करण्यात यावी, यास मान्यता देण्यात आली आहे. लाभार्थ्याकडे जर काही घटक उपलब्ध असतील तर उर्वरीत आवश्यक घटकांचा लाभ विहीत मर्यादेत देण्यास मान्यता देण्यात आली आहे. (उदा. विहीर असल्यास वीज जोडणी, सूक्ष्म सिंचन संच, विहीर व पंपसंच असल्यास सूक्ष्म सिंचन संच इ.) उपरोक्त घटकांचा लाभ घेतल्यानंतरही लाभार्थ्यांने इनवेल बोअरींग व परसबाग या घटकांची मागणी केल्यास विहीत मर्यादेत सदर घटकांचा अतिरिक्त लाभ देण्यास मान्यता देण्यात आली आहे. नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण किंवा पाण्याचा स्रोत उपलब्ध असणाऱ्या लाभार्थ्याची या योजनेंतर्गत एखाद्या घटकासाठी निवड झाल्यास त्यास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेतून प्राथम्यक्रमाने पंपसंच मंजूर करण्यात येईल.
विशेष घटक योजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यास पंपसंच देणे आवश्यक असल्यास, पंपसंचाचा प्रस्ताव, कृषी विकास अधिकारी यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची पंपसंचाची योजना राबविणाऱ्या यंत्रणेकडे पाठवून प्राथम्य क्रमाने पंपसंच मंजूर करून घेण्याची कार्यवाही करण्यास मान्यता देण्यात आली आहे. लाभार्थ्यास महावितरण कंपनीकडून सोलर पंप मंजूर झाला असेल तर, पंपसंच व वीज जोडणीसाठी अनुज्ञेय अनुदानाच्या मर्यादेत (रु.50,०००) लाभार्थी हिस्सा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या योजनेतून महावितरण कंपनीकडे भरण्यात येईल.
त्याचप्रमाणे या योजनेंतर्गत लाभार्थ्यास अ) नवीन विहीर, आ) जुनी विहीर दुरुस्ती, इ) शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण यापैकी एकाच घटकाचा व त्यासोबतच्या पॅकेजचा लाभ देय राहील, यास मान्यता देण्यात आली आहे.
अ) नवीन विहीर या घटकाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यास नवीन विहीर, इनवेल बोअरिंग, वीज जोडणी आकार, विद्युत पंपसंच/डिझेल इंजिन, सोलर पंप (वीज जोडणी व पंपसंच ऐवजी), एचडीपीई/ पीव्हीसी पाईप, सूक्ष्म सिंचन संच, यंत्रसामुग्री, परसबाग या घटकांसह एकूण रु. 6,42,००० किंवा रु. 6,92,००० एवढ्या मर्यादेत अनुदान देण्यात येईल. (विहीर- रु.4,००,०००+ इनवेल बोअरिंग-रु.40,000 + वीज जोडणी आकार-रु.20,000 + विद्युत पंपसंच/डिझेल इंजिन- रु. 40,000 किंवा सोलर पंप (वीज जोडणी व पंपसंच ऐवजी)- रु.50,000 + एचडीपीई/पीव्हीसी पाईप- रु. 50,000 + तुषार सिंचन संच रु. 47,000/ठिबक सिंचन संच रु. 97,000 + यंत्रसामुग्री- रु.50,000+ परसबाग रु.5,000 = रु. 6,42,000/ किंवा रु. 6,92,000).
आ) जुनी विहीर दुरुस्ती या घटकाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यास जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरिंग, वीज जोडणी आकार, विद्युत पंपसंच/डिझेल इंजिन, सोलर पंप (वीज जोडणी व पंपसंच ऐवजी), एचडीपीई/पीव्हीसी पाईप, सूक्ष्म सिंचन संच, यंत्रसामुग्री, परसबाग या घटकांसह एकूण रु. 3,42,000/किंवा
रु. 3,92,००० एवढ्या मर्यादेत अनुदान देण्यात येईल. (जूनी विहीर दुरुस्ती- रु.1,00,000+ इनवेल बोअरिंग-रु.40,000 + वीज जोडणी आकार-रु.20,000 + विद्युत पंपसंच/डिझेल इंजिन- रु. 40,000 किंवा सोलर पंप (वीज जोडणी व पंपसंच ऐवजी)- रु.50,000 + एचडीपीई/पीव्हीसी पाईप- रु. 50,000 + तुषार सिंचन संच रु. 47,000/ठिबक सिंचन संच रु. 97,000 + यंत्रसामुग्री- रु.50,000+ परसबाग रु.5,000 = रु. 3,42,000/ किंवा रु. 3,92,000).
इ) शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण या घटकाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यास शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण, वीज जोडणी आकार, विद्युत पंपसंच/डिझेल इंजिन, सोलर पंप (वीज जोडणी व पंपसंच ऐवजी), एचडीपीई/पीव्हीसी पाईप, सूक्ष्म सिंचन संच, यंत्रसामुग्री, परसबाग या घटकांसह एकूण रु. 4,02,000/किंवा रु. 4,52,000 एवढ्या मर्यादेत अनुदान देण्यात येईल. (शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण – रु.2,00,000 + वीज जोडणी आकार-रु.20,000 + विद्युत पंपसंच/डिझेल इंजिन- रु. 40,000 किंवा सोलर पंप (वीज जोडणी व पंपसंच ऐवजी)- रु.50,000 + एचडीपीई/पीव्हीसी पाईप- रु. 50,000 + तुषार सिंचन संच रु. 47,000/ठिबक सिंचन संच रु. 97,000 + यंत्रसामुग्री- रु.50,000+ परसबाग रु.5,000 = रु. 4,02,000/ किंवा रु. 4,52,000).
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी पात्रतेच्या अटी पुढीलप्रमाणे राहतील. लाभार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द शेतकरी असला पाहिजे. शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.शेतकऱ्याच्या नावे जमिन धारणेचा ७/१२ दाखला, ८-अ चा उतारा असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याचे बँक खाते असणे व हे बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे. दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यास प्रथम प्राधान्य राहील.
या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी लागू असलेली रु.१,५०,००० वार्षिक उत्पन्न मर्यादेची अट रद्द करण्यात येत आहे. लाभार्थी शेतकऱ्याकडे किमान ०.४० हेक्टर व कमाल ६ हेक्टर एवढी शेत जमीन असणे आवश्यक असेल. मात्र, लाभार्थ्यांची जमीन दुर्गम भागात व विखंडीत असल्याने ०.४० हे. पेक्षा कमी जमीन धारणा असलेले दोन किंवा अधिक लाभार्थी एकत्र आल्यास त्यांची एकत्रित जमीन किमान ०.४० हे. इतकी होत असल्यास त्यांनी करार लिहून दिल्यास त्यांना योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. त्याचप्रमाणे दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना कमाल ६.० हे. धारणक्षेत्राची अट लागू असणार नाही. एकदा संबंधित योजनेचा पूर्ण लाभ घेतल्यास पुढील पाच वर्ष त्याच लाभार्थ्यास किंवा कुटुंबास या योजनेचा लाभ देय होणार नाही.अशाच स्वरुपाच्या कृषी विषयक विकास योजनेकरता विशेष घटक योजनेतून तसेच केंद्र शासनाच्या एससीए (SCA) व घटनेच्या कलम २७५ (A) अंतर्गत उपलब्ध करुन दिलेल्या निधीतून राबविण्यात येणाऱ्या योजनेतून लाभ दिला असल्यास या योजनेंतर्गत देण्यात येणारा लाभ अनुज्ञेय असणार नाही. या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर त्याबाबतची नोंद घेण्यात येईल.