मुंबई, दि. 8 (जि.मा.का.) : राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या वतीने घेण्यात आलेल्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2024 चा निकाल घोषित करण्यात आला असून, जिल्हास्तरीय विजेत्यामध्ये छत्रपती श्री. शाहू तालीम मंडळास पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षीय उपस्थितीत आणि शुभ हस्ते बुधवार, दिनांक ९ ऑक्टोबर २०२४ रोजी करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय पारितोषिकाचे स्वरूप रुपये 25 हजार प्रत्येकी, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र असे आहे.
राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार भारत माता गणेश मंडळ, देवनांदरा, जि. परभणी, द्वितीय पुरस्कार जय भवानी मित्र मंडळ, ठाणे व तृतीय पुरस्कार वसुंधरा वृक्षरुपी गणेशोत्सव, लातूर यांना जाहीर झाला आहे. राज्यातील पहिला क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास 5 लाख, द्वितीय क्रमांकास 2 लाख 50 हजार आणि तृतीय क्रमांकास रुपये 1 लाख इतक्या रकमेचे पारितोषिक, सन्मानाचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय उर्वरित 33 जिल्ह्यांसाठीही जिल्हा निहाय पारितोषिक विजेते जाहीर करण्यात आले आहेत.
यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा (प), मुंबई येथे दुपारी 12 वाजता हा पारितोषिक वितरण समारंभ असून शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार अनिल देसाई आणि आमदार सदा सरवणकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी साईलीला कला मंच व विनायक पुरुषोत्तम लिखित व दिग्दर्शित, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम कलाकार निखिल बने व निमिष कुलकर्णी यांचे सादरीकरण असलेला ‘नमन गणेशा ‘ हा सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केले आहे.