कोल्हापूर दिनांक 3 – कोल्हापूरचा ताराबाई पार्क मधील सर्किट हाऊस मागील भाग तसा शांतच परंतु या भागात सुध्दा आता वेगवेगळी हॉटेल्स सुरू झाली आहेत.त्यातच इकडून कदमवाडी – मार्केट यार्डला जाण्यासाठी सोयीस्कर रस्ता असल्याने नागरिकांची ये – जा असते.त्यातच या परिसरातील एका मोठ्या रहिवासी संकुलातच परमिट रूम आणि बीअर बार सह डिस्को थेकला परवानगी दिल्याचे समोर येत आहे.मुळात रहिवाशी संकुलात बीअर बार व परमिट रूमला नागरिकांच्या ना हरकती शिवाय परवानगी दिली जात नाही.तरीसुद्धा एका धनदांडग्या व्यावसायिकाने राजकारण्यांना हाताशी धरून या ठिकाणी परमिट रूम साठी परवानगी मिळवली असल्याचे चित्र समोर येत आहे.तिथेच एक मोठे हॉस्पिटल सुध्दा असल्याचे समजते.हॉस्पिटल पासून 75 मीटरच्या आत बीअर बारला कायद्याने परवानगी देता येत नाही.तरीसुद्धा राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी “मॅनेज तपासणी अहवाल” दिला आहे का? याची चर्चा रंगू लागली आहे. या आलिशान बीअर बारला आजूबाजूच्या जवळपास 140 नागरिकांच्या तक्रारी असताना जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित जागेचा वापर निकष बदलून परमिट रूम व बीअर बार सुरू करण्याकरिता आवश्यक आदेश दिला असल्याचे समजते.तिथे आता कानठळ्या बसविणाऱ्या रंगीत मैफिलिसह दर शनिवारी डिस्को थेक सुरू झाला असल्याचे समजते.त्यामुळे आजूबाजूचे नागरिक हैराण झाले आहेत.मग 140 लोकांच्या तक्रारी आणि कायदा धाब्यावर बसवून या पाप पर्वाला परवानगी देणारे हात कोणाचे आहेत याची चर्चा आता सामान्य जनतेत रंगू लागली आहे.सदरच्या तक्रारी राज्य उत्पादन शुल्क विभाग,जिल्हाधिकारी कार्यालय,महानगरपालिका,पोलीस स्टेशन सह सर्वांकडे असताना त्याला केराची टोपली कोणामुळे दाखवली गेली हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे.या संपूर्ण प्रकरणाची माहिती माहिती -अधिकारात कागदपत्रांसह हाती लागल्याचे समजते.तसेच राज्य उत्पादन शुल्कच्या संबंधित अधिकाऱ्यांची सुध्दा चौकशी होणे गरजेचे आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून सदर बीअर बारचा परवाना रद्द करण्याच्या मागणी साठी सामाजिक संघटनेतर्फे जनआंदोलन उभे केले जाणार असल्याचे समजते.