कोल्हापूर, दि. २० : ठाणें-मुंबई येथे संभाजी ब्रिगेडचे अधिवेशन झाले. या अधिवेशनात ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्यावर टीका केली. या टीकेचा निषेध करत महाराव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत कोल्हापुरातील सर्व स्वामी समर्थ भक्ता़कडूंन आज (शुक्रवारी) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये पांच हजार स्वामी भक्त सहभागी होते. महिला स्वामी भक्तही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
ज्ञानेश महाराव यांनी संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात प्रभू श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्यावर टीका केली. त्याचबरोबर त्यांनी अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांच्या बद्दल देखील आक्षेपार्ह विधान केले. तसेच श्री संत गाडगे महाराज व संत श्री तुकाडोजी महाराज यांच्या कार्यावर सुध्दा आक्षेप घेतला. महाराव यांनी केलेल्या टीकेमुळं श्री स्वामी समर्थ भक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरलाय. आज शुक्रवारी सकाळी ११.०० वाजता ऐतिहासिक दसरा चौकात सर्व स्वामी भक्तांच्यावतीने श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर राजर्षी छत्रपती श्री शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला.
मोर्चामध्ये भजनी मंडळे, टाळ, मृदुंग, निषेधार्थ फलक,भगवे झेंडे, भगव्या टोप्या घालून भक्त मोठ्या संख्येने सामील झाले होते. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा गजर करत भक्त उन्हाचा तडाखा असूनही शिस्तबद्ध पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात होते.
यावेळी भक्तांनी महाराव यांच्या विरोधात कोण म्हणते महाराव… हा तर एक महाभाग…कावळा करतो काव काव…चोपून काढा महाराव…जाहीर निषेध…जाहीर निषेध…विकृत प्रवृतीचा जाहीर निषेध. ह्या मुर्खाला अटक करा. मुर्खांचा महाराव, करोडो लोकांच्या आराध्य दैवतांचा अपमान सहन करणार नाही, असे फलक लोकांनी हातात घेतले होते.
व्हीनस काॅर्नर मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्यानंतर काही वेळ स्वामींच्या घोषणा देत प्रमुख आयोजकांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना महाराव यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन स्वामीभक्त खासदार धैर्यशील माने यांचेसह स्वामी भक्तांच्या साक्षीने दिले. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक स्वामी भक्त सुहास पाटील, तर मोर्चाचे नियोजन धनंजय महिंद्रकर सांगितले. निवेदन वाचन कुलदीप जाधव यांनी केले. तर अरुण गवळी यांनी आभार मानले.
या मोर्चाचे आयोजन अरुण गवळी, कुलदीप जाधव, प्रथमेश माळी, सुहास पाटील, रमेश चावरे, धनंजय महिंद्रकर, अमोल कोरे, गुरुदेव स्वामी, अभिनंदन शिंदे आदी भक्तांनी केले.