कोल्हापूर, दि. 12 (जिमाका): माहे ऑगस्ट 2024 मधील अन्नधान्य वितरण करण्यासाठी राज्यातील सर्व्हरशी संबंधित तांत्रिक अडचणींचे निराकरण होईपर्यंत विशेष बाब म्हणून ऑफलाईन धान्य वितरणास परवानगी देण्यात आली आहे.
पात्र लाभार्थ्यांस पारदर्शक पध्दतीने अन्नधान्याचे वितरण होणे आवश्यक आहे. यासाठी ऑफलाईन अन्नधान्याचे वितरण ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, सरपंच यांच्या उपस्थितीत करण्यात यावे व त्यांनी त्याबाबतच्या नोंदी प्रमाणित कराव्यात. या कालावधीतील ऑफलाईन वितरण केलेल्या धान्याचाच तपशील शासनास सादर करावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले आहे.
राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरण प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक ओळख पटवून अन्नधान्य वितरण करण्याकरीता रास्तभाव दुकानांमध्ये 4G तंत्रज्ञान असलेल्या ई-पॉस मशिन बसविण्यात आल्या आहेत. राज्यात काही दिवसांपासून रास्तभाव दुकानांमधील ई-पॉस मशिनमधून अन्नधान्य वितरण करताना तांत्रिक अडचणी येत असल्याने, केंद्र शासनाच्या अन्नधान्य वितरणाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार माहे जुलै, 2024 मध्ये अन्नधान्य वितरणासाठी ऑफलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अजूनही या तांत्रिक समस्येचे पुर्ण निराकरण झाले नसून ऑनलाईन अन्नधान्य वितरणास अडचणी येत असल्याचे निदर्शनास येत आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांच्या अनुषंगाने अफवादात्मक परिस्थितीमध्ये ऑफलाईन धान्यवाटप करण्याकरीता रास्तभाव दुकाननिहाय लॉगिन तयार करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रिय कार्यालयांना ई-मेलव्दारे देण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्यातील रास्तभाव दुकानदारांचे लॉगिन IMPDS पोर्टलवर तयार करण्यात आले असून जिल्हातील सर्व रास्तभाव दुकानांचे IMPDS पोर्टलवर लॉगिन तयार करण्यात आले आहे.