कोल्हापूर, दि. 12 (जिमाका) : जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रश्नांबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधित स्थानिक नागरिक व गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये विविध प्रश्नांवर चर्चा करुन जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर उपस्थित होते. यावेळी सेनापती कापशी ता. कागल येथील ६५० घरांच्या नोंदी सिटी सर्व्हे मध्ये करण्याबाबात पुर्वीपासून अनाधिकृत असलेल्या घरांसाठी शासकीय नियमांप्रमाणे दंड भरून प्रक्रिया राबवावी लागणार असल्याचे सांगितले. चिकोत्रा धरणाच्या लाभ क्षेत्रातील जमिनीवरील पुनर्वसन शेरा कमी करण्याबाबत झालेल्या चर्चेत 11 फेब्रुवारी 2022 शासन निर्णयानुसार जमीन फक्त शेतीसाठी विक्री करता येणार आहे. आणि त्यासाठी पुन्हा परवानगी घेण्याची गरज नसल्याचेही त्यामध्ये नमूद असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. तसेच ४ एकर आणि ८ एकर यामधील जर काही प्रकरणे राहिली असतील तर त्यांची माहिती सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. या विषयांबाबत येत्या शुक्रवारी पुन्हा बैठक लावण्यात आली आहे.
शेंडूर तालुका कागल येथील धनगर समाजाच्या अतिक्रमण जागेमध्ये वीज व पाणी कनेक्शन देण्यासंदर्भात झालेल्या बैठकीत वीज व पाण्यासाठी शासनाच्या नियमांनुसार कोणत्याही सुविध देता येत नाहित. त्यामुळे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावर इतर माध्यमातून तोडगा काढण्यासाठी पुढिल आठवड्यात निर्णय घेवू असे सांगितले. तसेच सिध्दार्थ हौसिंग सोसायटी, गडहिंग्लज ता. गडहिंग्लज ब वर्गातून अ वर्ग करण्याबाबत 15 टक्के प्रमाणे कर भरणा करावी लागणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. सिध्दनेर्ली ता. कागल येथील नदिकिनारा येथिल पूरग्रस्तासांठी दिलेले प्लॉट रितसर देवून नावे करण्याबाबत दोन सातबारा वेगवेगळे करून देण्याचे ठरले. कागल नगरपरिषदेकडील १५६ घरकुल बांधकामांकरीता स. न. २८४ चे शासकीय जागेच्या मागणीच्या प्रस्तावाबाबत तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश पालकमंत्री मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिले. कागल नगरपरिषद कंपोस्ट डेपोचे स.नं.४०६ पै. उर्वरित क्षेत्र शासकीय जागाचा घनकचरा व्यवस्थापनाकरीता आगाऊ मागणीच्या प्रस्तावाबाबतही बैठकीत चर्चा झाली.