मुंबई, दि.७ : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पाठपुराव्याने उत्तुर, ता.आजरा, जि. कोल्हापूर येथे ६० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व संलग्नित ६० रूग्णखाटांचे रूग्णालयास मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आली.
मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, माझ्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत नवीन शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व संलग्नित ६० रुग्णखाटांचे रुग्णालय यांसाठी निकषानुसार आवश्यक व सुयोग्य जागा (किमान ३ एकर) निश्चित करुन सदर जागा जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्यामार्फत निःशुल्क उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच सदर जागेत नवीन शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
महाराष्ट्रात CCRYN (Central Council for Research in Yoga & Naturopathy) या केंद्रिय संस्थेद्वारा नोंदणीकृत योग व निसर्गोपचार विषयक शिक्षण देणारी (पदविका / सर्टिफिकेट कोर्स) व उपचार करणारी एकुण ५ संस्था (केंद्रीय व खाजगी) कार्यरत आहेत. सदर केंद्रिय व खाजगी संस्था या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांनी बी.एन.वाय.एस. साठी विहीत केलेला “पदवी अभ्यासक्रम” राबवित नाहीत. तसेच, महाराष्ट्र राज्यात योग व निसर्गोपचार पदवी अभ्यासक्रमाचे एकही शासकीय महाविद्यालय नाही. यास्तव उत्तुर, ता.आजरा, जि. कोल्हापूर येथे ६० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व संलग्नित ६० रुग्णखाटांचे रूग्णालय स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.
नवीन शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व रुग्णालयासाठी आवश्यक असणारी पदे उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने भरण्यास मान्यता देण्यात आले आहे.
या शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयासाठी आवश्यक तसेच अतिरिक्त बांधकाम करण्यास व त्यासाठी आवश्यक खर्चास मान्यता देण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.