कोल्हापूर, दि. 6 (जिमाका) : राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांना अधिक स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे तसेच महिला व मुलींना सुरक्षित प्रवास करण्यासाठी जिल्ह्यात रोजगारासाठी पिंक (गुलाबी) ई-रिक्षा खरेदी करण्यासाठी इच्छुक गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी ई-रिक्षा उपलब्ध करुन देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित झाला आहे. या योजनेतून लाभ मिळवण्यासाठी इच्छुक महिलांनी पात्रतेनुसार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, कसबा बावडा, कोल्हापूर (फोन – 0231- 2661788) येथे अर्ज करावेत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी केले आहे.
*योजनेचे स्वरुप आणि लाभार्थ्यांची पात्रता खालीलप्रमाणे-*
लाभार्थी कुटूंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय १८ ते ३५ वर्षे दरम्यान असणे अनिवार्य आहे. लाभार्थी कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 3 लाखापेक्षा जास्त नसावे. लाभार्थ्यांकडे वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे. विधवा, कायद्याने घटस्फोटीत, राज्यातील इच्छुक प्रवेशित, अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती, अनुरक्षणगृह बालगृहातील आजी, माजी प्रवेशिता यांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच दारिद्रय रेषेखालील महिलांना सुध्दा प्राधान्य देण्यात येईल. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील. लाभार्थ्यांची निवड जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत असलेल्या समितीकडून करण्यात येईल. पात्र लाभार्थी ई-रिक्षा किंमतीच्या १० टक्के, राज्य शासन २० टक्के आणि बँक ७० टक्के कर्ज उपलब्ध करुन देईल. कर्जाची परतफेड ५ वर्ष (६० महिने) आहे. योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला एकदाच लाभ घेता येईल.
****