*गुन्हा दाखल करून पोलीस सर्वसामान्य कुटुंबाला न्याय देणार का?
कोल्हापूर दिनांक 20 – गेल्या महिन्यात रवींद्र शिंदे रा. हूजुर गल्ली, यांनी गोकुळ शिरगाव येथील एका लॉजमध्ये आत्महत्या केली आहे. सदरची आत्महत्या मटक्याच्या v सावकारी व्याजाच्या उधारीतून झाली असल्याचा रवींद्र शिंदे यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. त्याअनुषंगाने रवींद्र शिंदे यांची पत्नी श्रीमती हेमा शिंदे यांनी आज गोकुळ शिरगाव पोलिसांकडे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने निवेदन दिले.त्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, माझे पती रवींद्र शिंदे हे लक्ष्मी रोडवर
मसाल्याच्या दुकानात कामाला होते. तसेच रामकृष्ण गवळी, प्रवीण गवळी, निलेश गवळी हे बंधू चहाची गाडीचा व्यवसाय महानगरपालिकेजवळ करतात. तसेच गवळी बंधुंचा मटक्याचा व्यवसाय असून आजूबाजूच्या दुकानामध्ये फिरत चहा देण्यासोबत ते मटका घेण्याचे काम करीत असतात. माझे पती व गवळी बंधुंची ओळख असल्याने माझे पती त्यांच्याकडे मटका खेळत होते. त्यातून माझ्या पतींची गवळी यांच्याकडे उधारी होऊ लागली. त्यामुळे गवळी बंधूनी माझ्या पतीच्या मागे पैशासाठी तगादा लावला त्यातून माझे पतींनी त्यांना बहुतांश रक्कम दिली आहे. त्यानंतर गवळी बंधूनी माझ्या पतींना मानसिक त्रास देण्यास सुरवात केली त्यानंतर गवळी यांनी माझ्या पतीची दुचाकीगाडी अँ क्सेस काढून घेतली होती. त्यानंतर त्याला गाडीबाबत विचारले असता त्याने उधारीच्या थकबाकी वर व्याजावर भरमसाठ रकमेची मागणी केली. त्यानंतर मला व माझ्या माझ्या मुलाला शिवीगाळ केली. त्यानंतर आम्ही त्याला रु. 40,000/- देऊन गाडी सोडवून घेतली. त्यानंतरसुद्धा गवळी हा माझ्या पतीच्या कामाच्या ठिकाणी जास्त पैशासाठी त्रास देऊ लागला. त्यानंतर माझे पती सतत तणावाखाली राहू लागले. तसेच गवळी याने माझ्या मुलाचा मोबाईल काढून घेतला होता. आम्ही त्याला रु. 30000/- दिल्यानंतर त्याने मोबाईल परत दिला. माझे पती हे सातत्याने गवळी याच्या त्रासाला कंटाळले होते. त्यानंतर दि. 26/6/24 रोजी माझे पती घरातून न सांगता निघून गेले. त्यानंतर 27 जून रोजी त्यांनी गोकुळ शिरगाव येथील हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याचे समजले. माझे पतींना त्याआधी व त्यादिवशी सुद्धा गवळी याने एकसारखे कॉल करून माझ्या पतींना त्रास दिला असल्याचे समजले. त्यामुळे आमच्या घरातील कर्ता पुरुष गेल्याने आमच्या कुटुंबाचे अतोनात नुकसान झाले आहे. तरी माझ्या पतींच्या मृत्यूला गवळी कुटुंबीय जबाबदार असून त्यांच्यामुळेच माझ्या पतींनी आत्महत्या केली असून त्यांच्यावर गुन्हा नोंद होऊन आम्हाला न्याय मिळावा असे नमूद करून कारवाईची मागणी केली आहे.त्यानुषंगाने पोलीस आता काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.