कोल्हापूर, दि. 6 (जिमाका): दक्षिण आफ्रिकेत झालेल्या जगातील सर्वात जुन्या, मोठ्या आणि लांब पल्ल्याच्या कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील उंड्री (ता. पन्हाळा) येथील अमोल एकनाथ यादव यांनी देशातून चौथा क्रमांक पटकावला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून भारताचे प्रतिनिधित्व करणारे यादव पहिलेच कॉम्रेड रनर असून या यशासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार तसेच सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
दक्षिण आफ्रिकेतील डरबन ते पीटरमेरीसबर्ग या दोन शहरांतून ही मॅरेथॉन झाली. दक्षिण आफ्रिकेतील सैनिकांच्या स्मरणार्थ असलेल्या या कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत सुमारे ८७ किलोमीटर अंतर १२ तासांच्या आत पार करायचे होते. या खडतर मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी सातारा येथील “शिवस्पिरीट” चे कोच शिव यादव व आहारतज्ज्ञ दिव्यानी निकम यांचे मार्गदर्शन लाभल्याचे अमोल यादव यांनी यावेळी सांगितले.
या स्पर्धेत जगभरातून ३० हजार स्पर्धक धावले होते. यात भारतातील ३३६ स्पर्धकांचा सहभाग होता. अत्यंत कठीण आणि १ हजार ८०० मीटर उंच चढण या खेळाडूंनी यशस्वीपणे पुर्ण केली. अमोल यादव यांनी ५ मोठे व २५ लहान डोंगर पार करत हे अंतर ८ तास २२ मिनिटांत पूर्ण करुन बिल रोवण मेडल प्राप्त करुन भारतातून चौथा क्रमांक प्राप्त केला आहे.