कोल्हापूर, दि. 6 (जिमाका): पन्हाळा तालुक्यातील मौजे वाडी रत्नागिरी येथील श्री केदारलिंग देवस्थान मूर्ती सुस्थितीत राहण्यासाठी सहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग, पुणे यांच्या वतीने श्री केदारलिंग देवाच्या मूर्तीचे संवर्धन दि. 7 ते 11 जुलै 2024 या कालावधीत करण्यात येणार असून या कालावधीत भाविकांना मुर्तीचे दर्शन घेता येणार नाही, या कालावधीमध्ये भाविकांना उत्सव मूर्ती व कलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. भाविकांनी कासव चौकातून कलश व उत्सवमूर्तीचे दर्शन घेऊन, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीला सहकार्य करावे, असे आवाहन समितीचे सचिव सुशांत बनसोडे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक अमोल येडगे यांनी मूर्तीची पाहणी करण्यासाठी पुरातत्व विभागास कळविले होते. पुरातत्व विभाग पुणे यांच्याकडून मूर्तीची पाहणी करण्यात आली. मूर्ती सुस्थितीत राहण्यासाठी मूर्तीचे संवर्धन प्रक्रिया करण्याबाबत सहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग, पुणे यांनी अहवाल दिला असून या नुसार मुर्तीचे संवर्धन करण्यात येणार आहे.