* आज पासून ऑनलाईन अर्ज दाखल होण्यासाठी चोख नियोजन करा
* कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर राहण्यासाठी नियोजनबद्ध काम करा
* निःशुल्क अर्ज भरता येत असल्याने आमिषाला बळी पडू नका
• कोणतीही अडचण आल्यास तहसीलदार, गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा
* ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रति लाभार्थी 50 रुपये मानधन
* 21 ते 65 वयोगटातील लाभार्थी महिलांना 1500 रुपयांचा मिळणार लाभ
कोल्हापूर, दि. ४ : ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्रे देणे, अर्ज भरुन घेणे आदी प्रक्रिया पार पाडताना कोणत्याही कार्यालयात किंवा सेतू सुविधा केंद्रात महिलांची अडवणूक, दिरंगाई किंवा पैशांची मागणी होणार नाही, याची दक्षता घ्या, असे निर्देश देवून महानगरपालिका, नगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डात व प्रत्येक गावात उद्यापासून ऑनलाईन अर्ज दाखल होण्यासाठी चोख नियोजन करा. या योजनेच्या अंमलबजावणीत कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर राहील, असे काम करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सचिन कांबळे आदी उपस्थित होते. इचलकरंजी महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी व सर्व संबंधित अधिकारी दूरदृष्यप्रणाली द्वारे बैठकीत सहभागी झाले.
जिल्हाधिकारी श्री. येडगे म्हणाले, या योजनेसाठी “नारी शक्ती दुत” ॲपवर निःशुल्क ऑनलाईन अर्ज भरण्याची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी लाभार्थ्यांनी कोणत्याही अमिषाला बळी पडू नये. तसेच योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करुन देणे किंवा अर्ज भरुन देण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची मदत घेवू नका. कोणतीही अडचण आल्यास तहसीलदार, गटविकास अधिकारी अथवा बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा, असेही आवाहन त्यांनी केले.
योजनेसाठी नावनोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला १८ हजार रुपये राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणार आहेत. तसेच ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रति लाभार्थी 50 रुपये मानधन देण्यात येणार आहे. कागदपत्रे उपलब्ध करून घेण्यासाठी किंवा अर्जाच्या नोंदणीसाठी गर्दी होणार नाही, यादृष्टीने योग्य नियोजन करा. अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
या योजनेची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार प्रसिद्धी करा. तसेच कोणत्याही कार्यालयात या योजनेची माहिती घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना योग्य ती माहिती द्यावी. दैनंदिन झालेल्या कामाच्या सद्यस्थितीबाबत जिल्हा प्रशासनाला माहिती द्यावी, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिल्या.