कोल्हापूर दि ३ : महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर तर्फे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले व शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांचे नेतृत्वाखाली आज ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत नागरिकांच्या येणाऱ्या समस्या संदर्भात करवीर तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
तहसील कार्यालयासमोर शहर अध्यक्ष प्रसाद पाटील यांचे नेतृत्वाखाली मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करीत तहसीलदार कार्यालयात प्रवेश केल्याने तहसीलदार कार्यालयात प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
याप्रसंगी तहसीलदार स्वप्निल रावडे यांची मनसे पदाधिकारी शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले. ज्यामध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत पंधरा दिवसाच्या असणाऱ्या मुदतीमध्ये उत्पन्नाचा दाखला, डोमेसाईल सर्टिफिकेट इत्यादी कागदपत्रे मिळवणे हे सर्वसामान्य माता भगिनींना खूप हलाखीचे आणि कठीण जात आहे. नियमित परिस्थिती मध्ये ऑनलाईन सबमिट केल्यानंतरही आठ-आठ दिवस दाखले मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल सर्टिफिकेट माता-भगिनींना त्वरित मिळणे गरजेचे आहे. तहसीलदारांच्या डेस्क ला येईपर्यंत अगोदर तीन डेस्क मधून परमिशन द्यावी लागत असल्याने प्रत्येक डेस्कला वेळ लागत आहे. तरी आपण या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन सर्व डेस्कला ऑनलाईन अर्ज आल्यानंतर ते लगेचच ऍप्रूव्ह करण्यासंदर्भात त्वरित सूचना द्याव्यात. जेणेकरून उत्पन्नाचा दाखला व डोमेसाईल सर्टिफिकेट साठी कोल्हापुरातील माता-भगिनी लाडकी बहीण योजनेच्या अनुदानापासून वंचित राहू नयेत. मनसे कोल्हापूर तर्फे आम्ही स्वतः या योजनेअंतर्गत लागणारे सर्व उत्पन्नाचे दाखले, डोमेसाईल सर्टिफिकेट व सर्व कागदपत्रे स्वखर्चाने माता भगिनींना मोफत काढून देत आहोत. तरी उत्पन्नाचे दाखले व डोमेसाईल सर्टिफिकेट तात्काळ द्यावीत अशी मागणी मनसेतर्फे शहराध्यक्ष प्रसाद पाटील व तालुकाध्यक्ष अभिजीत पाटील यांनी केली.
तसेच सर्व तलाठी हे आपल्या तलाठी कार्यालय अर्थात सज्जावरती सातत्याने गैरहजर असतात , खाजगी उमेदवारांच्या मार्फत दाखल्यासाठी पैसे घेऊन सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करतात.
याप्रसंगी मनसे कोल्हापूरच्या आंदोलनाची दाहकता व गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी यासंदर्भात परिपत्रक जारी करून नायब तहसीलदार व अव्वल करून यांना त्यांच्या डेस्कला उत्पन्नाचे दाखले व रहिवासी दाखले येतात त्या संदर्भी तात्काळ ते अप्रू करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच सर्व तलाठ्यांना संपूर्ण कार्यालयीन वेळेमध्ये आपल्या सज्जावरती उपस्थित राहण्याचे व शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी देखील संपूर्ण वेळ आपल्या कार्यालयामध्ये उपस्थित राहून उत्पन्नाचे दाखले व रहिवासी दाखले संपूर्ण कामकाजाची पूर्तता करण्याचे आदेश काढून सर्व मनसे पदाधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन याप्रसंगी स्वप्निल रावडे यांनी मनसेच्या शिष्टमंडळात दिले.
या आंदोलन प्रसंगी शहराध्यक्ष प्रसाद पाटील, तालुकाध्यक्ष अभिजीत पाटील, जिल्हा सचिव निलेश आजगावकर, तालुका उपाध्यक्ष अरविंद कांबळे , शहर उपाध्यक्ष सुनील तुपे, राजन हुल्लोळी, सुरज कानुगडे, चंद्रकांत सुगते, उत्तम वंदुरे, अमित साळोखे, गणेश लाखे, संतोष खटावकर, प्रशांत माळी, विकी पहुजा, आदित्य सोनटक्के, प्रवीण जाधव, गौरव मिसाळ, अमर कंदले, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजीत राऊत शहराध्यक्ष अजिंक्य शिंदे, राधानगरी तालुकाध्यक्ष राहुल कुंभार, बाजीराव दिंडोर्ले, गणेश शिंदे इत्यादी मनसे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.