कोल्हापूर दि. 29 (जिमाका) : भारताच्या इतिहासातील अद्वितीय व्यक्तिमत्व व कोल्हापूरचा मानबिंदू असलेले आदर्श राजे पुरोगामी विचाराचे महान समाज सुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून माणगाव सन्मानभूमी येथे जिल्हा प्रशासन, शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सव समिती आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने समाज अभियांत्रिकी आणि राजर्षी शाहू विषयावर माणगाव येथील ए. पी. मगदूम हायस्कूल येथे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
संताच्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे या महापुरुषांचे विचार प्रत्येकाने आत्मसात करून राज्यघटनेनुसार आपण आपले जीवन जगले पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत प्राध्यापक डॉ. शरद गायकवाड यांनी समाज अभियांत्रिकी आणि राजर्षी शाहू या विषयावर मार्गदर्शन करताना केले.
या परिसंवाद कार्यक्रमात माणगाव परिषद सामाजिक परिवर्तनाचा मानबिंदू या विषयावरती प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील यांनी विद्यार्थी, युवक वर्ग, बचत गटाच्या महिला, नागरिक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच इतर उपस्थित यांच्याशी संवाद साधला.
विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घ्यावे आपल्या हातून सामाजिक सेवा घडावी असे वर्तन ठेवावे अशा भावना इचलकरंजीच्या उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना व्यक्त केल्या. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्ष श्रीमती नंदिनी आवडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमामध्ये माणगाव गावचे सरपंच डॉ. राजू मगदूम यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांचा हस्ते सत्कार करण्यात आला. समाजसुधारकांचे विचार समाजामध्ये जोपासण्यासाठी सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचे माणगाव गावास नेहमीच सहकार्य मिळते असे सरपंच डॉ. मगदूम यांनी सांगितले.
प्रारंभी माणगाव येथील महामानवांच्या स्मारकास मान्यवरांनी अभिवादन केले. तद्नंतर शालेय विद्यार्थ्यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन परब व श्रीमती एस आर माने यांनी केले तर आभार ए. पी. मगदूम हायस्कूल माणगावचे मुख्याध्यापक प्रकाश बिरनाळे यांनी मानले.
या कार्यक्रमास हातकणंगले तहसीलदार कल्पना ढवळे, अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने, गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी, कृषी अधिकारी श्री. देशमुख, समाज कल्याण निरीक्षक
राहुल काटकर, गृहपाल मुलांचे शासकीय वस्तीगृह हातकणंगले, उत्तम कोळी, समाज कल्याणचे विशाल पवार, सचिन कांबळे, तालुका समन्वयक अनुराधा कांबळे व सुरेखा डवर, माणगाव गावचे नागरिक, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी तालुका अभियान व्यवस्थापक श्री. ठोंबरे, गावातील समुदाय संसाधन व्यक्ती, ग्रामविकास अधिकारी मंडळ अधिकारी तलाठी बचत गटातील महिला, ए पी मगदूम हायस्कूलचे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामपंचायत माणगाव सरपंच, उपसरपंच, सदस्य कर्मचारी वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.