*कलाकारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांचे आवाहन
कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) : राज्य शासनाच्या राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकारांना मानधन सन्मान योजना पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद यांच्याकडे वर्ग करण्यात आली आहे. या योजनेचे कार्यान्वयन सध्या समाज कल्याण विभागाकडे सुरु असून ही योजना समाज कल्याण विभागामार्फत ग्रामपंचायत विभागाकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सन 2019 ते सन 2023-24 मधील सर्व लाभार्थी निवडीची प्रलंबित प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून लाभार्थी अंतिम करण्यासाठी निवड याद्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई यांना सादर करण्यात आल्या आहेत. या योजनेच्या अनुषंगाने शासन स्तरावरुन निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाचे तंतोतंत पालन करण्यात येत असून सद्यस्थितीत दिनांक 16 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार ही योजना ग्रामपंचायत विभागाकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील कलाकारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार यांनी केले आहे.