कोल्हापूर दि २७ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या परोपकारी कार्यासाठी त्यांना भारतरत्न देण्याची मागणी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.
हा मुद्दा केंद्र सरकारकडे मांडणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. पुरातत्व विभागातर्फे कोल्हापूर शहरातील शाहू स्मारक भवन येथे आयोजित छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनगाथा उलगडणाऱ्या ऐतिहासिक दुर्मिळ कागदपत्रे आणि छायाचित्रांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची 150 वी जयंती बुधवारी कोल्हापूर शहरात उत्साहात साजरी करण्यात आली.
शाहू स्मारक भवन येथे आयोजित हे प्रदर्शन ३० जूनपर्यंत चालणार आहे. यात प्रामुख्याने छत्रपती शाहू महाराजांचे दत्तक विधान, त्यांचा राज्यारोहण, त्यांच्या काळातील पत्रव्यवहार, गरीब व दुर्बलांसाठी त्यांनी केलेले कार्य दाखविण्यात आले आहे. शाहू महाराजांच्या काळातील दुर्मिळ छायाचित्रे आणि कागदपत्रेही प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत.
राजर्षी शाहू महाराज यांची जयंती ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्ताने जिल्हा प्रशासन व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाच्या वतीने दसरा चौकात समता दिंडीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूर शहर हे खेळाडूंचे शहर असल्याने या दिंडीत पैलवान, फुटबॉलपटू व इतर खेळाडू सहभागी झाले होते.
समता दिंडी दसरा चौकातून निघून व्हीनस कॉर्नर चौक, आई साहेबांच्या पुतळ्यामार्गे जाऊन बिंदू चौकात सांगता झाली.
शाहू स्मारक भवन येथे बुधवारी शाहू मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत पन्नालाल सुराणा यांना राजर्षी शाहू पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी.टी.शिर्के, मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आदी उपस्थित होते.