राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार व कार्य भावी पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या
हेतूने शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती उत्सवाचे आयोजन
शाहू विचार जागर कार्यक्रमाने जयंती महोत्सवाला प्रारंभ
सर्व कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन
कोल्हापूर, दि. 26 (जिमाका): आपला गौरवशाली, जाज्वल्य इतिहास डोळ्यांसमोर उभा करण्यात शाहिरी पोवाडे महत्त्वपूर्ण भुमिका बजावत असल्याचे प्रतिपादन करुन राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार व कार्य भावी पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने जिल्ह्यात शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती उत्सवानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमांना सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षा निमित्त (150 वे जयंती वर्ष) जिल्हा प्रशासनाच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रम घेण्यात आले आहेत. या जयंती महोत्सवाची सुरुवात जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वामी विवेकानंद कॉलेज येथे घेण्यात आलेल्या ‘शाहू विचार जागर’ कार्यक्रमाने करण्यात आली. यावेळी शाहीर राजू राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, सुशांत बनसोडे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, विवेक काळे, तहसीलदार स्वप्नील रावडे तसेच विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, सहकार क्षेत्रासह प्रत्येक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. शाहू महाराजांच्या अलौकिक कार्यामुळेच कोल्हापूर जिल्ह्याची वेगळी ओळख जगभरात आहे. इतिहासातील घटना व शाहू महाराजांच्या कार्याची महती तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यात शाहिरी पोवाड्यांचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शाहीर राजू राऊत यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यावर आधारित सादर केलेल्या पोवाड्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली..