गडहिंग्लज आणि कागल तालुक्यातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा
कोल्हापूर, दि. 25 (जिमाका): कोल्हापूर कागल राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु असून कागल शहरातील उड्डाणपूल पिलर वरतीच करण्याची मागणी गावकऱ्यांची आहे. त्यामुळे त्यासाठी सुधारित प्रस्ताव तयार करुन उड्डाणपूल लोकांच्या मागणीनुसार उभारावा, असे निर्देश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना दिले. कागल शहरातील रहिवाशांच्या अडचणी, वाहतूक, उसाच्या गाड्या आणि सांडपाणी याबाबतचे प्रश्न सुटावेत, अशी मागणी स्थानिकांची आहे. त्यानुसार बदल करुन राष्ट्रीय महामार्गांचे काम करावे असेही त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री, मुश्रीफ यांनी रस्ते व वाहतूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशीही उड्डाणपूल कामातील बदलाबाबत दुरध्वनीद्वारे चर्चा केली. या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
गडहिंग्लज आणि कागल तालुक्यातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा
गडहिंग्लज आणि कागल तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासन आणि संबंधित गावांची बैठक घेतली. यावेळी गडहिंग्लज शहरातील वडरगे रस्ता येथील क्रीडा संकुल, गांधीनगर हाउसिंग सोसायटी येथील प्रॉपर्टी कार्ड, अतिक्रमण, खाटीक समाजाचे प्रलंबित प्रश्न तर कागलमधील बाळेघोळ, सावर्डे बुद्रुक, मांगनुर येथील जमिनीचा प्रश्न, प्रॉपर्टी कार्ड विविध प्रश्नांवर चर्चा झाली. यावेळी गडहिंग्लज आणि कागल तालुक्यातील सर्व प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचेसह अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने, सुशांत बनसोडे, तहसीलदार अमर वाकडे तसेच संबंधित गावांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.