कोल्हापूर दि १८ : राज्यातील १२ जिल्ह्यांतील ८ हजार हेटर सुपीक जमिनीची गरज असलेला नागपूर-गोवा महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, या मागणीसाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नागरिक आणि शेतकरी मंगळवारी कोल्हापूर शहरात आंदोलन करणार आहेत.
शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक डॉ. मनोज पाटील म्हणाले, “आंदोलकांनी दसरा चौकातून व्हीनस कॉर्नर आणि विधानसभा मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाण्याचा विचार केला आहे. रॅलीला मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या सूचनेनुसार नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आपत्कालीन वाहने वगळता अनेक रस्ते तात्पुरते वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहेत.
दसरा चौकाकडे जाणारे सर्व रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणारी वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात येईल.
चित्रदुर्ग मठ, करवीर पंचायत समिती कार्यालय, जैन बोर्डिंग आणि महावीर महाविद्यालयाच्या मैदानावर रॅलीत सहभागी होणाऱ्या लोकांसाठी दुचाकी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. लक्ष्मी जिमखाना (व्हीआयपी वाहन पार्किंग), व्हीनस कॉर्नर गाडी अड्डा, शहाजी कॉलेज मैदान, 100 फूट रोड, होमगार्ड मुख्यालय, सेंट झेवियर्स स्कूल, मेरी वेदर मैदान आणि पंचगंगा घाट येथे चारचाकी वाहनांचे पार्किंग असेल, असेही पाटील यांनी सांगितले.
आंदोलनाचे संयोजक गिरीश फोंडे म्हणाले, “पवनार ते पत्रादेवी (नागपूर-गोवा) महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला विरोध असतानाही, राज्य सरकारने भूसंपादनाची अधिसूचना जाहीर केली असून त्यावर आक्षेप घेण्यासाठी २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.”