सार्वजनिक ठिकाणांसह प्रत्येक शासकीय कार्यालयात आता होणार तपासणी
जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा संपन्न
कोल्हापूर, दि. १४ (जिमाका) : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची २२ वी सभा व जिल्हास्तरीयस नियंत्रण समितीची २० वी सभा जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. जिल्हाधिकारी तथा समितीचे अध्यक्ष अमोल येडगे यांनी समितीचा व कक्षाच्या कामाचा आढावा घेऊन आवश्यक सूचना केल्या. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आज झालेल्या समितीच्या बैठकीसाठी समिती सदस्य पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी प्राथमिक तसेच राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष अधिकारी व कर्मचारी यात डॉ. निलेश पाटील, चारुशीला कणसे, क्रांती शिंदे, प्रियंका लिंगडे उपस्थित होते. यावेळी अशासकीय सदस्या स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधी मेघाराणी जाधव उपस्थित होत्या.
शहरात जिल्हा परिषद कार्यालय, महानगरपालिका यासह जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हास्तरीय इतर शासकीय कार्यालयात तंबाखूजन्य पदार्थ खाणारे नागरिक किंवा कर्मचारी आढळल्यास कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. ते म्हणाले, प्रत्येक शासकीय कार्यालयात तंबाखूजन्य पदार्थ खाल्ल्यास कारवाई केली जाईल असे फलक लावल्याची खात्री करा. प्रत्येक विभाग प्रमुखाला शासकीय कार्यालय या सार्वजनिक ठिकाणी तंबाखू बाबत दंड वसुलीचे निर्देश द्या. शासकीय आस्थापनांनी तंबाखू मुक्तीसाठी टीम तयार करून दैनंदिन स्वरूपात त्या त्या ठिकाणी भेट देऊन तपासणी करावी. एनटीसीपी कक्षाकडून शाळेच्या आवारात वेळोवेळी भेटी देऊन तपासणी करा तसेच शंभर यार्डच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री होते का नाही याबाबतची तपासणी करून तसे आढळल्यास कडक कारवाई करा. शालेय स्तरावर आठवी, नववी दहावीच्या माध्यमिक विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून तंबाखू मुक्तीसाठी प्रयत्न करा जेणेकरून पुढील पिढीकडे कोणत्याही प्रकारचे तंबाखूचे व्यसन आढळून येणार नाही. तंबाखूमुक्त गाव संकल्पना सुरू करुन याबाबत गावागावात जनजागृती करून लोकांना तंबाखू पासून होणाऱ्या दुष्परिणामांचे महत्त्व पटवून द्या. त्यांचे प्रबोधन करून करण्यात येणाऱ्या दंडांचे प्रमाण वाढवा. शालेयस्तरावर शिक्षक किंवा शासकीय स्तरावरील अधिकारी, कर्मचारी यांच्यावरही कायद्याचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी बैठकीत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्षाला व समिती सदस्यांना दिल्या.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मंजूर पीआयपी मधील कार्यक्रमांचे नियोजन, अंमलबजावणी व सनियंत्रण करणे. तंबाखूमुक्त सेवा केंद्रे (TCC) स्थापन करुन तंबाखूमुक्ती समुपदेशन सेवा देणे. तंबाखू मुक्त शाळा करणे व शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबवणे, कोटपा कायदा 2003 अंतर्गत कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण कक्षांतर्गत तसेच पोलिस विभाग अन्न व औषध प्रशासन विभाग यांचेसोबत पानटपऱ्यांवर धाडी टाकणे. आरोग्य संस्था तसेच शासकीय व निमशासकीय सर्व संस्था तंबाखूमुक्त करण्याबाबत प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी वेळोवेळी कार्यशाळा घेऊन जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येतात.
कोटपा कायदा 2003
कलम-4 सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास बंदी- 200 रुपयांपर्यंत दंड
कलम -5 तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरातीवर बंदी- पहिला गुन्हा असेल तर 2 वर्षापर्यंत शिक्षा किंवा रु 1 हजार पर्यंत दंड. दुसरा गुन्हा असेल तर 5 वर्षापर्यंत शिक्षा / किंवा 2 हजार रुपयांपर्यंत दंड
कलम-6
१८ वर्षाखालील व्यक्तीना तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी व शैक्षणिक संस्थेच्या १०० यार्ड परिसरात
तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी- यासाठी 200 रु. दंड
कलम -7 सर्व तंबाखूजन्य पदार्थाच्या वेस्टनावर निर्देशित धोक्याची सूचना देणे- उत्पादकाचा पहिला गुन्हा असेल तर 2 वर्षापर्यंत शिक्षा किंवा 5 हजार रुपयांचा दंड. विक्रेत्याचा पहिला गुन्हा असेल तर 1 वर्षापर्यंत शिक्षा किंवा 1 हजार पर्यंत दंड आकारण्यात येतो.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या आर्थिक वर्षामध्ये खालील उपक्रम राबविण्यात आले.
कार्यशाळा -सामान्य, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालये या २१ संस्थांमध्ये आरोग्य मेळावे घेण्यात आले. माता सुरक्षित तर घर सुरक्षित सप्ताह अंतर्गत विविध मंदिरामध्ये कॅम्प घेण्यात आले.
धाडी- प्राथमिक,माध्यमिक शिक्षण विभाग (शाळेच्या १०० यार्ड परिसरात अनाधिकृत पानटपरी ) अनाधिकृत पानटपऱ्यांवर धाडी.
तंबाखूमुक्तीसाठी क्षेत्रभेटी- उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालये, प्रा. आ. केंद्रे. उपकेंद्रे भेटी व जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शाळा भेटी
तंबाखूमुक्तीकरिता शपथ कार्यक्रम- जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच इतर शासकीय कार्यालयांमध्ये १५ ऑगस्ट, २ ऑक्टोबर गांधी जयंती, प्रजासत्ताक दिन, ३१ में चे औचित्य साधुन तंबाखूमुक्तीची शपथ कार्यक्रम राबविण्यात आले.
सिगारेट आणि तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा (कोटपा २००३) प्रसिद्धी – कोटपा कायदा २००३ संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आले.
टोल फ्री नंबरची प्रसिद्धी- तंबाखूच्या टोल फ्री नंबर (१८००-११-२३५६) ची वर्तमानपत्र व प्रसार माध्यमे यांच्यामार्फत प्रसिद्धी करण्यात आली.
शालेय स्पर्धा- १२ तालुक्यातील शाळा व कॉलेजमध्ये तंबाखूविरोधी स्पर्धाचे नियोजन करण्यात आले.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अहवाल- (एप्रिल 2023 ते मार्च 2024 प्रोग्रेसिव्ह रिपोर्ट)
तंबाखूमुक्ती समुपदेशन केंद्रात नोंदणी झालेल्या रुग्णांची संख्या 4 हजार 571, तंबाखूमुक्त शाळांची संख्या 143,
दंडात्मक कार्यवाही झालेल्या लोकांची संख्या- 943, आरोग्य विभाग दंडवसुली 20 हजार 240, पोलिस विभागाअंतर्गत दंडवसुली 1 लाख 43 हजार 900 व अन्न व औषध प्रशासन अंतर्गत दंडवसुली 1 हजार 200 रुपये.