कोल्हापूर, दि. 12 (जिमाका) : शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी विविध दाखल्यांची मागणी विविध नागरिक, जनतेकडून होत असते. यासाठी जिल्ह्यात एकूण 1 हजार 612 गावांमध्ये 1 हजार 551 आपले सरकार सेवा केंद्रे सुरु आहेत. महसूल व वन विभागाकडील शासन निर्णयानुसार ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणाऱ्या दाखल्यांसाठी दर निश्चित करण्यात आले आहेत. या दरानेच सेवा पुरविणे केंद्र चालकास बंधनकारक आहे. यामध्ये 20 रुपये + 10 रुपये महा ऑनलाईन स्टँप ड्युटी + GST असे एकूण 33.60 रुपये आकारणे आवश्यक आहे.
या दरपत्रकाचा फलक दर्शनी भागामध्ये लावणे, शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार केंद्र सुरु ठेवणे, हेल्पलाईन क्रमांकाचा तपशील केंद्राच्या दर्शनी भागावर प्रसिध्द करणे, सर्व ग्राहकांना सौजन्याची वागणूक देणे आणि आवश्यक मदत व सहकार्य करणे अशा सूचना जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्रचालकांना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत. या सेवा योग्य प्रकारे पुरविण्यात येत नसतील तर संबंधित तालुक्यांचे तहसिलदार उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तात्काळ संपर्क साधावा. तक्रारीचे निराकरण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले आहे.