शीघ्र प्रतिसादासाठी चांगल्या प्रकारे तयारी करण्याच्या आपत्ती व्यवस्थापन टीम व स्वयंसेवकांना सूचना
कोल्हापूर, दि.३ : आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक कार्यक्रमाला राजाराम बंधारा, कोल्हापूर येथे दि.३१ मे पासून सुरूवात झाली आहे. पूर व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भेट देवून आपत्ती व्यवस्थापन टीमचा आढावा घेवून प्रात्यक्षिक पाहणी केली. यावेळी त्यांनी पूरपरिस्थिती उद्भविल्यास शीघ्र स्वरूपात प्रतिसाद देण्यासाठी चांगल्या प्रकारे तयारी करून सर्व आवश्यक साहित्य तयार ठेवा अशा सूचना आपत्ती व्यवस्थापन टीम व उपस्थित स्वयंसेवकांना दिल्या. आपत्ती, आणीबाणी, प्रथमोपचार, धोका, आपत्तीचे प्रकार, आपत्ती आणि आपत्कालीन व्यवस्थापन, चक्रीवादळ, वीज पडणे, कृत्रिम श्वासोच्छवास आदींबाबत माहिती व प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची आपत्ती ओढवल्यास हे प्रशिक्षणार्थी तेथे जावून मदत कार्य करून जिवीत हानी टाळू शकतात. यावेळी पाण्यात बुडणाऱ्याला वाचविणे, तरंगणाऱ्या दोरीने बुडणाऱ्याला वाचविणे, बोटीने शोधमोहिम, बोट उलटल्यास बचाव मोहिम, दोन, तीन, चार हातांची बैठक, स्ट्रेचर, अग्निशमन दल आदी प्रात्यक्षिक घेण्यात आले. या प्रशिक्षणावेळी उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, तहसिलदार स्वप्निल रावडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ व प्रशिक्षणार्थी आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवक उपस्थित होते. प्रात्यक्षिक पाहिल्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बोटीने प्रवास करून राजाराम बंधारा परिसरातील पंचगंगा नदी घाटाची पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्हयात आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असून जर पूरस्थिती उद्भवली तर त्याचा सामना करण्यासाठी ७० पेक्षा जास्त बोट आहेत. एक हजार लाईफ जॅकेट, रेस्क्यूसाठी आवश्यक सर्व साधान सामुग्री, दोन हजार आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवक तथा आपदा मित्र तयार आहेत. आवश्यक आपत्ती साधन सामुग्रीची तपासणी व दुरूस्ती जिल्हा तसेच दोन्ही महापालिकास्तरावर झालेली आहे असे सांगितले. या वर्षी मान्सून चांगला येणार असल्याचे अंदाज आहेत. त्यामूळे जर कुठे पूरस्थिती निर्माण झाली तर प्रशासन सज्ज असून वेळोवेळी प्रशासन, स्वयंसेवक आणि नागरिक यांच्या मदतीने आपत्तीविषयक मोहिमा हाती घेतल्या जातील असे पुढे म्हणाले.
पावसाशी संबंधित समस्यांच्या वेळी लोकांमध्ये जलद प्रतिसादाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रम आखले जातात. माहे जूनमध्ये मान्सूनचे आगमन होणार आहे. मान्सूनच्या काळात अतिवृष्टी होऊ शकते. नदीकाठच्या गावात पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा पूरपरिस्थितीच्या वेळी जिवीत व वित्त हानी कशी टाळता येऊ शकते. यासाठी पूर परिस्थितीत शोध व बचाव कसा करावा याबाबत काम करणाऱ्या सर्व यंत्रणाचे वेळोवेळी प्रशिक्षण आयोजित केले जाते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या मार्फत दि. ३१ मे ते ०२ जून २०२४ आपत्ती प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. ३१ मे रोजी साधन सामुग्री तपासणी, आवश्यक ती दुरुस्ती व पाण्यामध्ये चाचणी घेण्यात आली. ०१ जून रोजी जिल्हाधिकारी यांचे उपस्थितीत पूर व्यवस्थापन प्रात्यक्षिके, बोटीची चाचणी, बोटीच्या साहाय्याने शोध व बचाव कार्य प्रात्यक्षिके संपन्न झाली. तर ०२ जून रोजी स्वयंसेवकांचे पूर व्यवस्थापन प्रशिक्षण, शोध व बचाव प्रशिक्षण, बोट चालविणे प्रशिक्षण सकाळी ०९ ते साय. ०५ वाजेपर्यंत आयोजित केले जाणार आहे.