कोल्हापूर, दि. 31 (जिमाका): जिल्ह्यातील प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 व पशुसंवर्धन विभागाच्या शासन निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व पशुधनास ईअर टॅगिंग बंधनकारक करुन त्यांची नोंदणी ‘भारत पशुधन प्रणाली’ वर प्रविष्ट होण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अध्यक्ष अमोल येडगे यांनी आदेश निर्गमित केले आहेत.
केंद्र शासनाच्या भारत पशुधन प्रणालीमध्ये ईअर टॅगिग (12 अंकी बार कोडेड) केलेल्या सर्व पशुधनाच्या सर्वकंष नोंदी घेण्यात येत आहेत. राज्यातील सर्व पशुधनाची सर्वकष माहिती एका ठिकाणी उपलब्ध होवून पशुधनामधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण करण्याकरिता तसेच प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच पशु व पशुजन्य उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करुन त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक केले आहे.
खालील प्रमाणे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत:-
सर्व ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका कोल्हापूर व इचलकरंजी यांनी 1 जून 2024 नंतर ईअर टॅगिंगशिवाय पशुधनास पशुवैद्यकीय संस्था / दवाखान्यामधून कोणतीही पशुवैद्यकीय सेवा देण्यात येवू नये. तसेच आपल्या अधिनस्त असलेल्या कत्तलखान्यामध्ये टॅग असल्या शिवाय म्हैस वर्गीय जनावरांची कत्तल करण्यास परवानगी देण्यात येऊ नये.
सर्व महसूल, वन, वीज व महावितरण विभाग यांना सूचित करण्यात येते कि, नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच वन्य पशूच्या हल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास ईअर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसान भरपाईची रक्कम देय होणार नाही.
कोणत्याही पशुधनाची वाहतूक ईअर टॅगिंग असल्याशिवाय करता येणार नाही, तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतूकदार यांच्यावर उचित कायदेशीर, दंडात्मक कार्यवाही करावी.
दि. 1 जून 2024 पासून ईअर टॅग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या, आठवडी बाजार व गावा गावातील खरेदी- विक्री व बैलगाडा शर्यंत आयोजन करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. त्यामुळे ईअर टॅग नसलेल्या पशुधनास बाजार समितीमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये व त्यांची खरेदी विक्री होणार नाही याची दक्षता संबंधित बाजार समितीने घ्यावी, तसेच सर्व ग्रामपंचायत, महसूल विभाग, गृह विभाग यांनी ईअर टॅग नसलेल्या बैलांना बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग घेण्यास परवानगी देवू नये.
पशुधनाच्या मालकी हस्तांतरणाबाबतच्या नोंदी संबधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्वरीत अद्ययावत करुन घेण्याची जबाबदारी संबधित पशुपालकाची राहील.
ग्रामपंचायतीमध्ये पशुच्या विक्री किंवा परिवर्तनाचा दाखला देताना पशुधनाची ईअर टॅगिंग झाल्याशिवाय तो देण्यात येवू नये. दाखल्यावर ईअर टॅगचा क्रमांक नमूद करण्यात यावा.
आदेशात नमुद सुचनांची व पशुसंवर्धन विभागाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस विभाग, वन विभाग, महसूल विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था (जिल्हा परिषद, महानगर पालिका, कटक मंडळ, नगर परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायत), उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी काटेकोरपणे करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी केले आहे.