कोल्हापूर, दि. 31 (जिमाका): जिल्ह्यामध्ये वाढत्या श्वान दंशाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय रेबिज नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यात विविध प्रतिबंधात्मक व उपचारात्मक कार्यवाही करण्यासाठी समिती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वाढत्या श्वान दंशावर नियंत्रण आणण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार आरोग्य शिक्षण प्रचार व प्रसार करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड यांनी दिली आहे.
रेबिज नियंत्रण कार्यक्रम जिल्हा समिती सदस्य सचिव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय रणवीर यांनी जिल्हा स्तरावर व ग्रामीण स्तरावर उपलब्ध वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी व खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तसेच जिल्हा परिषदेमार्फत दर वर्षी विशेष बाब म्हणुन उपलब्ध अनुदानातुन अंदाजे 60 लाख निधीची तरतुद करण्यात येते. ज्याचा विनिमय रेबीज लस मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यासाठी होतो. जेणेकरुन ग्रामीण स्तरावर कोणताही रुग्ण वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाते.
जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत शहर व ग्रामीण स्तरावर श्वानांच्या निर्बिजीकरणासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला असुन कार्यवाही सुरु आहे. सन 2023 मध्ये जिल्ह्यात 75 हजार 346 जणांना श्वान दंश लागण झाली असून एकूण 3 जणांचा श्वानदंशाने मृत्यू झाला तर सन 2024 मध्ये माहे जानेवारी ते एप्रिल 2024 अखेर जिल्ह्यात 31 हजार 161 जणांना श्वान दंश लागण झाली असून एकूण 3 जणांचा श्वानदंशाने मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील सर्व शासकीय (सीपीआर, ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालय, इंदीरा गांधी सामान्य रुग्णालय इचलकरंजी, प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी आरोग्य केंद्र) इ. ठिकाणी रेबीज लसीचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध ठेवण्यात आला आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये वर्ग ३ प्रकारासाठी, श्वान दंश रेबीज इम्युनोग्लोब्युलिन इजेक्शन (RIG) उपलब्ध करण्यात आले असून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे.
पुढील सुचना व अंमलबजावणी करण्यात येत आहे.
श्वान दंश लस वर्गीकरण –
वर्ग १- प्राण्यांना स्पर्श किंवा आहार देणे, अखंड त्वचेवर चाट, लाळेद्वारे संपर्क, पिसाळलेले प्राणी, मानवी मलमुत्र संपर्कात आल्यास लस देण्याची आवश्यकता नाही.
वर्ग २- खरचटलेल्या किंवा रक्तस्त्राव न झालेल्या जखमा झाल्यास फक्त रेबीज लस देण्याची आवश्यकता आहे.
वर्ग ३- एक किंवा अनेक खरचटलेले व चाव्याद्वारे झालेल्या जखमा, लाळेद्वारे खंडित झालेल्या त्वचेशी संपर्क (खांद्याच्या वरिल भागात झालेल्या कोणत्याही जखमेस) रेबीज लस व रेबीज इम्युनोग्लोबीन देण्याची गरज आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजना –
कुत्रा किंवा इतर प्राणी चावल्यामुळे झालेली जखम साबण आणि नळाच्या वाहत्या पाण्याने किमान१५ मिनिटे स्वच्छ धुवा. जखमेला निर्जंतुक मलम लावा. जखम बांधु नये अगर तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय टाके घालु नये. ताबडतोब शासकीय दवाखान्यात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने रेबीज विरोधी लस घ्यावी. लसीच्या वेळापत्रकाचे तंतोतंत पालन करावे. जखमेला मिर्ची, तेल, चुना असे कोणतेही घातक पदार्थ लावु नये. आपल्या घरातील पाळीव प्राण्यांचे वेळोवेळी लसीकरण करावे. भटक्या श्वानांवर सनियंत्रण करण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या समन्वयाने निर्बीजीकरण करण्यासाठी सामुदायिक प्रयत्न करावे.
व्यापक जनजागृती –
कोणत्याही प्रकारची भिती न बाळगता तज्ञ डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याने उपचार घ्यावेत. पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर त्याचा चावा मानवी शरीरास किती प्रमाणात केला आहे या वर्गवारी वरुन वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्यानेच लस घ्यावी, अन्यथा टाळावी. गाय, म्हैस इ. दुध देणाऱ्या जनावरास पिसाळलेला कुत्रा चावल्यास त्या जनावराच्या दुधामुळे कोणतीही हानी होत नाही याबाबत नागरिकांमध्ये गैरसमज दिसुन येतो. श्वान दंश झाल्यावर गावातील भोंदुबुवाकडील गावठी औषधांचा वापर न करता जवळच्या सरकारी दवाखान्यात दाखवुनच पुढील उपचार घ्यावेत. गावातील अगर शहरातील खाटीक दुकाने, हॉटेल, तसेच खानावळी, टपऱ्या येथील अन्न व मांस उघड्यावर टाकु नये याची दक्षता सर्व व्यावसायिकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले आहे.