कोल्हापूर, दि. 31 (जिमाका): सर्कल स्तरावरील 127 वी डाक अदालत दिनांक 21 जून 2024 रोजी दुपारी 3 वाजता मुख्य पोस्टमास्तर जनरल, मुंबई यांच्या कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली असल्याची माहिती कोल्हापूर डाकघर विभागाचे प्रवर अधीक्षक अर्जुन इंगळे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल वस्तु, मनी ऑर्डर, बचत बँक खाते, प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठवली असेल त्याचे नाव व हुददा इत्यादी.
संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार सहायक निदेशक डाकसेवा (ज.शि.) आणि सचिव, डाक अदालत, मुख्य पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय, मुंबई एनेक्स बिल्डिंग, जी.पी.ओ. कॉम्पलेक्स, ४ था माळा, मुंबई 400001 यांच्या नावे दोन प्रतीसह दिनांक 7 जून 2024 पर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचेल अशा रितीने पाठवावी त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही.