कोल्हापूर, दि. 8 (जिमाका): आजरा तालुक्यातील चिकोत्रा मध्यम प्रकल्पामध्ये बाधीत गावांची संख्या ५ असून एकूण ६९४ प्रकल्पग्रस्त आहेत. यातील स्वेच्छा घेतलेले प्रकल्पग्रस्त ५५५ आहेत. ६५ टक्के भरलेले १३९, जमीन वाटप प्रकल्पग्रस्त ११५ तर शिल्लक २४ आहेत. राजपत्र २६ जुलै १९९५ नुसार लाभक्षेत्रातील गावांसाठी १.६१ हेक्टर आर स्लॅब निश्चित करण्यात आला. यातील भूसंपादन न झालेल्या जमिनीवरील शिक्के कमी करुन त्यांना परत करा, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या. यातील १.६१ हेक्टर आर च्या आतील लोकांचे सर्वेक्षण करा व तो प्रश्न जिल्हास्तरावर मार्गी लावा. तसेच १.६१ हेक्टर आर वरील यादी मंजुरीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवू असे ते यावेळी म्हणाले. यावर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्वेक्षण आठ दिवसात पूर्ण करुन घेण्याचे आश्वासन दिले.
चिकोत्रा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्याना शेतीसाठी पाणी कमी पडू नये, यासाठी नदीला योग्य प्रमाणात पाणी सोडण्याबाबत योग्य नियोजन करा, अशा सूचनाही पालकमंत्री श्री मुश्रीफ यांनी जलसंपदा विभागाला केल्या.
या बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, कार्यकारी अभियंता (मध्यम प्रकल्प) रोहित बांदिवडेकर, शिल्पा मगदूम व संबंधित गावातील नागरिक उपस्थित होते.