कोल्हापूर:- प्रामाणिकपणे कष्ट केल्यास जीवनामध्ये निश्चित यश प्राप्ती होत असते. विद्यार्थ्यांनी परीक्षेत चांगले मार्क मिळतील की नाही याची खंत मनामध्ये बाळगू नये. परीक्षेत उत्तम यश मिळविले नाही याचा अर्थ सारे काही संपले असा होत नाही. उलट नवे चांगले मार्ग उपलब्ध होण्यासाठी परीक्षा द्यायला लागतात असा सकारात्मक विचार करुन कोणताही गैरमार्ग न स्वीकारता परीक्षाला आनंदाने सामोरे जावे. नैतिकमुल्ये व सुसंस्कारीत विद्यार्थीच उज्ज्वल भारताचे भवितव्य घडवू शकतात असे प्रतिपादन
करवीरचे प्रभारी तहसीलदार विजय जाधव यांनी केले.
येथील शैक्षणिक व सांस्कृतिक समृद्धीची साक्ष देणारे जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल अँन्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये कॉपीमुक्त अभियानातंर्गत विद्यार्थ्यांच्या करिता शपथ सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थितांशी संवाद साधताना प्रभारी तहसीलदार विजय जाधव हे बोलत होते. प्रशालेचे प्राचार्य डॉ गजानन खाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या शपथ सोहळ्यासाठी उपप्राचार्या श्रीमती व्ही. ए. खडके, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री बी.पी.माळवे,प्रा. बी.टी. यादव, प्रा. एच. पी. काटकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये होणारी
बोर्ड परीक्षा ही शंभर टक्के कॉपीमुक्त व्हावी यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.या उपक्रमांतर्गत प्रशालेतील फेब्रुवारी-मार्चमध्ये इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेसाठी प्रविष्ट होत असलेल्या ३३४ विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेत कॉपी न करण्याची शपथ घेतली. विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंबंधीच्या शिक्षासूचीचे, उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठामागील सूचनांचे वाचन, मंडळाने सुचविलेल्या नमुन्यात ‘परीक्षेत गैरमार्ग करणार नाही’ अशा आशयाची शपथ प्राचार्य डॉ गजानन खाडे यांनी विद्यार्थ्यांनी देत परीक्षेच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी आरोग्याच्या बाबतीत सजग राहून उत्साह आणि ऊर्जा टिकवून आनंदी व भयमुक्त वातावरणात परीक्षा सामोरे जावे असे आवाहन केले. विद्यार्थांच्या जीवनातील दहावी, बारावी हा महत्वपूर्ण टप्पा असतो. या महत्त्वाच्या टप्प्यावर परीक्षा निकोप वातावरणात होणे, त्यातून शिक्षणाचा दर्जा उंचावणे यासाठी हे महत्वपूर्ण अभियान राबविण्यात येत आहे. केंद्रावर विद्यार्थ्यांना कॉपी आणि गैरप्रकार केल्यास कुठल्या प्रकारे शिक्षा होऊ शकते याच्या सूचना दिलेल्या आहेत. विषय शिक्षकाने आदर्श उत्तरपत्रिका या संदर्भात तसेच आरोग्य, ताणतणाव याविषयी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या कालावधीत मार्गदर्शन करावे असे आवाहन प्राचार्य डॉ. गजानन खाडे यांनी यावेळी केले. श्री बी.पी.माळवे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. प्रा. सुषमा पाटील यांनी आभार मानले.यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक, परीक्षार्थी विद्यार्थी उपस्थित होते.