कोल्हापूर, दि. 8 (जिमाका): जिल्ह्यातील शून्य ते पाच वयोगटातील बालकांना पोलिओ डोस मिळाल्याची खात्री करण्याकरिता क्षेत्रीय स्तरावर आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्ती यांच्या मार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपणाकडे येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करावे व पल्स पोलिओ लसीकरण मोहीम १०० टक्के यशस्वी करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.या बैठकीला प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, मुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बाल विकास शिल्पा पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, शिक्षणाधिकारी प्राथमिक मीना शेंडकर, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पोलिओ निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शून्य ते पाच वयोगटातील सर्व बालकांना दिनांक 3 मार्च रोजी पोलिओ डोस देण्यात येणार आहे. पोलिओ निर्मूलनासाठी नियमित लसीकरणांतर्गत सर्व पात्र बालकांचे वेळेत लसीकरण करुन घेणे, संशयित पोलिओ रुग्णांचा शोध घेऊन त्यांचे निदान करुन घेणे व 0 ते 5 वयोगटातील बालकांना अतिरिक्त पोलिओ डोस देणे ही त्रिसुत्री आहे. पर्यटन व जागतिकीकरणामुळे पोलिओ विषाणू पसरण्याची शक्यता असल्यामुळे 0 ते 5 वयोगटातील बालकांसाठी पोलिओचे दोन थेंब महत्त्वाचे आहेत.
या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यामध्ये ग्रामीण, शहरी तसेच महानगरपालिका विभागांतर्गत मागील तीन मोहिमेतील अहवालानुसार जिल्ह्यामध्ये शुन्य ते पाच वयोगटातील अंदाजीत 3 लाखापेक्षा जास्त बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे, त्यासाठी एकूण 2 हजार 508 बुथची निर्मिती करण्यात आली असून त्या अंतर्गत एकूण 6 हजार 999 कर्मचारी नियुक्त केले आहेत. अगदी बाळ नुकतेच जन्मलेले असले तरी पोलिओ डोस द्यावयाचा आहे. जिल्ह्यातील सर्व बाजारहाट गर्दीची ठिकाणे, धार्मिक स्थळे, बस स्थानके, टोल नाके व रेल्वे स्टेशन्स या ठिकाणी सुद्धा ट्रान्झीट टीम व दुर्गम भागातील वाड्यावस्त्यावरील भटक्या जमाती, ऊस तोडणी मजूर यांच्या मुलांना मोबाईल टीमद्वारे पोलिओ डोस देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण वेळेत पुर्ण करावे व मोहिमेची व्यापक प्रसिद्धी करावी, असे अवाहन केले. या ही वर्षी 0 ते 5 वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ लसीचा डोस मिळण्यासाठी पुरेशा लसीचा साठा उपलब्ध होणे तसेच वाडी वस्तीवरील दुर्गम भागातील प्रत्येक लाभार्थ्याला पोलिओ लस मिळावी यासाठीचे सूक्ष्म नियोजन केले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.