प्रत्येक अपघाताचे परिक्षण करा
प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील
कोल्हापूर, दि.12 (जिमाका):- प्रवाशांचा प्रवास जलद, आरामदायी, अपघात विरहीत व सुरक्षित होण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत 11 ते 25 जानेवारी दरम्यान सुरक्षितता माहिमेला सुरुवात झाली आहे. या मोहिमेचा शुभारंभ मध्यवर्ती बस स्थानक येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांच्या हस्ते व विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी उपस्थित वाहन चालकांना दीपक पाटील यांनी प्रत्येक अपघाताचे परिक्षण करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, प्रत्येक अपघाताची कारणे शोधावी लागतील. परिक्षण केल्यानंतरच आपणाला त्यावर उपाययोजना करून अपघातांचे प्रमाण कमी करता येईल. बस चालविताना वैमानिकासारखीच चालकाची जबाबदारी असते. मनाचे व शरीराचे स्वास्थ चांगले ठेवून आपण कर्तव्य बजावणे आवश्यक आहे. महामंडळाची मोहिम यशस्वी करण्यासाठी दूचाकी चालविताना हेल्मेट वापरा, व्यसन करून वाहन चालवू नका तसेच मन शांत राहण्यासाठी पुरेशी झोप घ्या, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
या कार्यक्रमाला कोल्हापूर राज्य परिवहन विभाग नियंत्रक अनघा बारटक्के, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर, आगार व्यवस्थापक अनिल म्हेतर, सहायक वाहतूक अधीक्षक मल्लेश विभूते यांच्यासह डेपो अधिकारी, वाहतूक कर्मचारी संघटनेचे सदस्य, वाहक, चालक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 25 वर्षे सुरक्षित सेवा बजावणाऱ्या 70 हुन अधिक चालकांना कार्यक्रमात 25 हजार रुपये रक्कम देवून सपत्निक सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्षीय भाषणात अनघा बारटक्के यांनी नैसर्गिक मृत्यूच्या खालोखाल जगात सर्वात जास्त मृत्यू रस्ते अपघातामुळे होणाऱ्या दुर्घटनांत होत असल्याचे सांगितले. प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेवूनच ही मोहिम राज्य स्तरावर राबविण्यात येत आहे. महामंडळामार्फत दरवर्षी 2 ते 3 कोटी रुपये अपघातात जखमी किंवा मृत्यू झालेल्यांना भरपाई पोटी द्यावे लागतात. एसटीच्या फायद्यातील मोठी रक्कम यासाठी खर्च होत असते. हा निधी वाचविण्यासाठी आपणाला आपघातांची संख्या शुन्यावर आणावी लागेल. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी चालकांबरोबरच यांत्रिकी विभागाचीही जबाबदारी मोठी आहे. बसेस चांगल्या स्थितीत ठेवणे व त्याची निगा राखणे अपघात कमी करण्यासाठी आवश्यक आहे.
यावेळी बारा आगारामध्ये दररोज सरासरी 2.37 लाख किलो मिटर प्रवासी वाहतूक कोल्हापूर विभागात केली जाते. या विभागातील आगारांमध्ये शिवशाही, निम आराम, जलद, रातराणी व साध्या अशा सुमारे 750 बसेस मार्फत 3 हजार 363 मार्गावर दररोज सरासरी सुमारे 2.43 लाख प्रवासी वाहतूक केली जाते. या विभागात सध्या 12 आगार 24 बस स्थानके आणि 224 मार्गस्थ निवारे उपलब्ध असल्याची माहिती कार्यक्रमात देण्यात आली. आगार व्यवस्थापक अनिल म्हेतर यांनी आभार मानले.