कोल्हापूर दि 11:काल झालेल्या काँग्रेसच्या सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली परिसंवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला दिसला यामध्ये सहयोगी पक्षाने देखील पाठिंबा दिल्याचे दिसून आले. आता राज्याच्या घडामोडींवर नजर टाकता राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये दोन गट पडलेले असून उभे फूट पडलेली आहे .या संपूर्ण गदारोळात काँग्रेस मात्र भक्कम उभी असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे काँग्रेसला येणाऱ्या काळात बळ वाढण्याची चिन्ह दिसत आहेत.आता राज्यातील चालू घडामोडी पाहता नेतेमंडळी ईकडून तिकडे उड्या मारत असताना मतदार सुद्धा आता संभ्रमात पडू लागले आहेत.सतेज पाटील यांचे विश्वासाचे राजकारण असल्याने त्यांच्याकडे कोल्हापूरची जनता विश्वासू आणि आश्वासक नेता म्हणून पाहताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर परवा सतेज पाटील यांनी काढलेल्या परिसंवाद यात्रेमध्ये मधुरिमा राजे उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या दिसल्या.तसेच अलिकडे मालोजीराजे सुद्धा सतेज पाटील यांच्यासोबत नेहमी दिसून येत आहेत. त्यामुळे कोल्हापूर उत्तर मधून मधुरीमा राजे यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार का याबाबत उत्सुकता लागून राहिलेली आहे. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे संजय मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी सतेज पाटील यांनी जीवाचे रान करुन धनंजय महाडिक यांचा पराभव केला होता.त्या काळामध्ये राजे गटाने संजय मंडलिक यांना साथ दिली होती त्यावेळी त्यांना बावड्यातून उत्तरचा “शब्द” दिला गेला असल्याचे बोलले जाते. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राजे गटाकडून मधुरिमा राजे रिंगणात उतरणार की काय हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.सध्या विद्यमान आमदार जयश्री जाधव ह्या कै आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी असून त्यांना पुन्हा संधी दिली जाणार की मधुरीमाराजे यांना संधी दिली जाणार हे बघणे महत्त्वाचे ठरेल.विद्यमान आमदार एक महिला असल्याने पुन्हा महिला उमेदवार देणे हिताचे व स्वागताचे ठरेल अशी रणनीती असल्याची चर्चा होंताना दिसत आहे.मधुरिमाराजे या दिवंगत माजी आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या आहेत.त्यामुळे मधुरिमाराजे याना राजकारणाचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले असल्याने त्यांचा तळागाळापर्यंत असलेला दांडगा जनसंपर्क ही जमेची बाजू आहे.पूर्वाश्रमीच्या करवीर मतदारसंघातील काही शहरी भाग आताच्या उत्तर मतदारसंघात आल्याने तिथल्या आधीच्या खानविलकर गटाची साथ मधुरिमाराजे यांना मिळू शकते.तसेच मालोजीराजे यापूर्वी आमदार राहिल्याने त्यांचा प्रबळ गट उत्तरमध्ये आहे.त्यामुळे काही दिवसांपासून राजे गटात आनंदाचे वातावरण असल्याचे दिसून येते.त्यामुळे येणाऱ्या काळात उत्तरवर मजबूत पकड असणाऱ्या “सतेज” निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.