कोल्हापूर,दि.९(प्रतिनिधी) देशात पत्रकार संरक्षण कायदा करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.तरीसुद्धा पत्रकारांवरील होणारे हल्ले,खुन तसेच खोटे गुन्हे दाखल करुन होत असलेली मुस्कटदाबी चिंतनीय आहे.पत्रकारांची अस्थिरता पाहता,आज कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने लोकशाहीचा पाया रचणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारक स्थळी आज चिंतन करुन,आपल्या वेदनेला फुंकर घातली.राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करुन,पत्रकारांनी आपली लेखणी ,कॅमेरा तसेच बुम प्रतिकात्मकरित्या छत्रपतींच्या चरणी ठेवुन, आपल्या न्याय्य मागण्यांवर चिंतन केले.यावेळी समाजातील विविध सामाजिक, राजकीय पक्ष,संघटनांकडून पत्रकारांना पाठिंबा व्यक्त करण्यात आला.यावेळी बोलताना कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे म्हणाले,समाजाचा आरसा ते कान,नाक,डोळा आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ अशी आपल्या पत्रकारांची ओळख.पण आज पत्रकारीतेत जशी स्पर्धा वाढली आहे,तशी अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत.रोखठोक,निर्भिड पणे बातमी करणा-या संपादक पत्रकार, फोटोग्राफर्स,कॅमेरामन यांच्यावरील वाढते जीवघेणे हल्ले करण्यासह त्यांच्यावरच गुन्हे दाखल करुन,दिवसेंदिवस पत्रकारीतेची अक्षरशः मुस्कटदाबी वाढतच चालली आहे.पत्रकारांच्या नोकरीच्या अनिश्चिततेचे वातावरण निर्माण होत आहे.पत्रकारांच्या न्याय हक्काच्या मागण्या आजही प्रलंबित आहेत.शासनस्तरावरून केवळ चालढकलच होताना दिसत आहे.लोकप्रतिनिधीं -कडुनही ताकतुंबाचा खेळ सुरु आहे.एकंदरीत या सर्व बाबींवर विचार विनिमय करण्यासाठी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारक स्थळी नतमस्तक होऊन, आपल्या वेदनेवर फुंकर घालत असल्याचेसांगितले.दरम्यान पत्रकारांच्या या चिंतन बैठकीत सहभागी होऊन,पत्रकारांचे प्रश्न अधिवेशनात मांडण्याची ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी दिली.यावेळी आमदार जयश्री जाधव,मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक,शशिकांत पाटील,शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार, प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई,भाजपचे अशोक देसाई,हर्षल सुर्वे,आम आदमी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन सचिव संदीप देसाई, डॉ.संदिप पाटील,रोटरीचे उदय पाटील वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे रघुनाथ कांबळे, किरण व्हनगुत्ते,उत्तम पाटील,जुना बुधवार तालमीचे संचालक सुशील भांदिगरे,धनंजय सावंत,बजरंग दलाचे बंडा साळोखे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी शहरातील तालीम संस्था,तरुण मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला.
महत्वाच्या मागण्या
पत्रकारांवरील हल्ले रोखा..
पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा..
विरोधात बातमी छापली म्हणून गुंडांकरवी होणारी मारहाण करणाऱ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करा…
सत्तेच्या जोरावर संपादक तसेच पत्रकारांवर गुन्हे दाखल करुन पत्रकारितेची मुस्कटदाबी थांबवावी…
कोल्हापूरसह राज्यभरात पत्रकारांनी मारहाण,धमकी देणाऱ्यांविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यासंदर्भात तातडीने कारवाई करावी..त्याची माहिती ज्या-त्या जिल्ह्यातील अधिकृत पत्रकार संघटनांना द्यावी..
अधिस्वीकृतीकार्ड संदर्भातील जाचक अटी कमी करुन,किमान दहा वर्षांहून अधिक काळ पत्रकारिता करणा-या पत्रकारांचा विचार करुन, अधिस्वीकृतीकार्डची संख्या वाढवावी..
जेष्ठ पत्रकार सन्मान योजना संदर्भातील काही जाचक अटी शिथिल करण्यात याव्या. राज्यस्तरावर प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लावुन,अत्यंत हालाखीत दिवस काढणा-या जेष्ठ पत्रकारांना निदान त्यांच्या हयातीत तात्काळ व विनाविलंब योजनेचा लाभ द्यावा….
शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी मधुन केवळ अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना वैद्यकीय मदत केली जाते.यामध्ये सरसकट सर्वच पत्रकारांचा समावेश करावा…
पत्रकार कल्याण मंडळ स्थापन करून,पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यात यावे..
लवकरच राज्यातील प्रमुख पत्रकार संघटनासोबत गोलमेज परिषद घेऊन…. सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार