कोल्हापूर दि 4:जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवर झालेल्या भ्याड लाठीहल्ल्याचा संपूर्ण महाराष्ट्रात निषेध वाढत असून मराठा समाज आक्रमक होत असल्याचे दिसून येत आहे.प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक गावात आता मराठा समाज एकवटू लागला असून संतापाची लाट असल्याचे चित्र आहे.संपूर्ण महाराष्ट्र तापला असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे कोल्हापूरमध्ये उत्तरदायित्व सभा घेण्यासाठी 10 सप्टेंबर रोजी येत आहेत.जालन्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सत्तेत असणाऱ्या राजकीय नेत्यांच्या सभांना मराठा समाज उपस्थिती लावणार की निषेध म्हणून पाठ फिरविणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.तसेच या सभेला मराठा समाजाकडून विरोध वाढताना दिसत आहे.सध्यातरी मराठा समाज या सभेला जाणार नसल्याचे समजून येत आहे.तसेच समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल या भीतीपोटी अजितदादा सभा रद्द करू शकतील असा अंदाज व्यक्त होताना दिसत आहे.