कोल्हापूर दि.०4 : काम करणाऱ्याच्या मागे जनता उभी राहते. निवडणुकीत जय – पराजय होत राहतात. परंतु, सामाजिक कार्याची शिकवण, लोकांना न्याय देण्याची धडपड सुरूच ठेवल्याने कोल्हापूर उत्तरसह कोल्हापूर दक्षिण मधील नागरिकांचेही पाठबळ वाढत चालले आहे. कोल्हापूर शहरातील अनेक तालीम संस्था, मंडळांचे काम गणेशोत्सव सह इतर सणापुरते मर्यादित नसून, सामाजिक भान जपत शहरातील अनेक संस्था नागरीकांवर ओढावलेल्या प्रत्येक संकटात मदतीसाठी पुढे धावून जातात, अशा सेवाभावी संस्थाची उन्नती व्हावी त्याद्वारे त्यांच्या सामाजिक कार्यास बळ मिळावे या हेतून शहरातील सेवा भावी संस्थांच्या पुनर्बांधणीस प्राधान्य देण्यात येत आहे. मतदारसंघाचा कोणताही भेदभाव न ठेवता दक्षिणोत्तर विकास पर्व सुरु असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले.
कोल्हापुरातील मानाचा गणपती असलेल्या श्री.छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाच्या इमारत बांधकामासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ साठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) योजनेतून रु.१ कोटी २० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबद्दल आज मंडळाच्या कार्यकारणी व भागातील नागरिकांच्या वतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर आणि देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर यांचा श्रीं चा फोटो, शाल, पुष्पहार, श्रीफळ देवून जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, गेली ३२ वर्षे अखंडितपणे दरवर्षी श्री छत्रपती संभाजीनगर तरूण मंडळाच्या मानाच्या श्रीं चे दर्शन घेत आहे. श्रीं च्या आशीर्वादातूनच सामाजिक, राजकीय श्रेत्रात काम करताना बळ मिळत आहे. कोल्हापुरातील अनेक शाहूकालीन संस्था, मंडळे आपल्या सामाजिक कार्यास प्रसिद्ध आहेत. अशा संस्थांची उन्नती व्हावी, असा उद्देश आहे. यामध्ये कोणताही राजकीय हेतू न ठेवता सामाजिक हेतूने विकास कामे होणे गरजेचे आहे. त्याचमुळे मतदारसंघाचा भेदभाव न ठेवता दक्षिणोत्तर विकास कामाचे पर्व सुरु करण्यात आले आहे. या निधीसाठी मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यांनी तात्काळ निधी मंजूर करण्याचे आदेश दिले. याकामी पालकमंत्री ना.मा.श्री.दीपक केसरकर यांचे सहकार्य लाभले. त्यांचे मनपूर्वक आभार. नियोजित इमारतीचे काम येत्या काही दिवसात सुरु करण्यात येणार असुन, आगामी काळात मंडळाची ६० वर्षे जुनी इमारत नव्या रुपात पहावयास मिळणार असल्याचे सांगितले.
यावेळी भागातील जेष्ठ नागरिकांनी अनेक वर्षे दुर्लक्षित असलेल्या मंडळाच्या इमारतीचा प्रश्न डोळ्यादेखत मार्गी लागत असल्याबद्दल श्री.राजेश क्षीरसागर यांचे भावुकपणे विशेष आभार मानले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री.अजित सासने, नेताजी शिंदे, जयसिंगराव यादव, भाई शेलार, फत्तेसिंह सावंत, सुनील साळोखे, किसनराव कल्याणकर, एकनाथ मिठारी, धनाजी घोरपडे, बबनराव जाधव, मोहन पाटील, अमरसिंह पाटील, सुहास भोला, शाम फर्नांडीस, श्रीकांत मगर, प्रकाश शिंदे, किशोर यादव, सुजित जाधव, किशोर यादव, अमर बागल, सुरेश पाटील, शिवसेनेचे किरण पाटील, निवास राऊत, उदय पाटील आदी भागातील नागरिक, मंडळाचे संचालक सदस्य, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.