कोल्हापुरा दि. ०२/०९/२०२३ :यावर्षी पुन्हा एकदा कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात, धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजपच्यावतीने दहीहंडीचा थरार आणि जल्लोष रंगणार आहे. यावर्षी गुरूवार दि. ७ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता युवाशक्ती दहीहंडी स्पर्धेला प्रारंभ होईल. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि गाजलेल्या युवाशक्तीच्या दहीहंडी स्पर्धेतील ३ लाख रूपयांचे बक्षिस पटकावण्यासाठी गोविंदा पथकांची चुरस रंगणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटनाला राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, पंकजा मुंडे यांच्यासह जिल्हयातील अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेमधील विजेत्या गोविंदा संघाला रोख ३ लाख रूपयांचे पारितोषिक दिले जाईल. शिवाय युवाशक्ती दहीहंडी स्पर्धेत सहभागी होणार्या प्रत्येक गोविंदा पथकाला, प्रोत्साहन देण्यासाठी अन्य बक्षिसांचा वर्षाव केला जाईल. पहिल्याच प्रयत्नात सहा थर रचून सलामी देणार्या गोविंदा पथकाला १० हजार रूपये, तर सात थर रचून सलामी देणार्या गोविंदा पथकाला १५ हजार रूपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच सर्वात वरच्या थरावर चढून, दहीहंडी फोडणार्या गोविंदाच्या सुरक्षेेसाठी विशेष उपाय योजना करण्यात आली आहे. त्यासाठी समीट ऍडव्हेंचरचे विनोद काम्बोज आणि हिल रायडर ऍडव्हेंचर फौंडेशनचे प्रमोद पाटील यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. शिवाय एखादा गोविंदा कार्यकर्ता जखमी झाल्यास त्याच्यावर तत्परतेने उपचार करण्यासाठी समीट ऍडव्हेंचरचे आणि हिल रायडर ऍडव्हेंचरचे कार्यकर्ते सज्ज असतील. तसेच सीपीआर आणि सिद्धगिरी हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकांसह डॉक्टरांचे पथक सज्ज असेल. दहीहंडी फोडणारा गोविंदा, १४ वर्षावरील असावा, या नियमाचे काटेकोर पालन केले जाईल. शिवाय महिला गोविंदा पथकांना २५ हजार रुपयांचे विशेष प्रोत्साहनपर पारितोषिक दिले जाणार आहे. स्वराज्य ढोलताशा पथक आणि सार्थक क्रिएशनच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी युवाशक्ती दहीहंडी स्पर्धेची रंगत वाढणार आहे. शासनाने दहीहंडी खेळाला साहसी खेळाचा दर्जा दिला आहे. त्यानुसार सर्व नियमांचे पालन करून स्पर्धेचे आयोजन होणार आहे.दरवर्षीप्रमाणे ऐतिहासिक दसरा चौक मैदानावर, युवाशक्ती दहीहंडीसाठी शिस्तबध्द नियोजन करण्यात आलेे आहे. उत्तम ध्वनी आणि प्रकाश व्यवस्था, निमंत्रित मान्यवरांसाठी भव्य व्यासपीठ, महिला आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था असणार आहे. शिवाय संपूर्ण दहीहंडी सोहळ्याचे चॅनल बी वरून थेट प्रक्षेपण होईल. युवाशक्ती दहीहंडीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित केले आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी युवाशक्ती दहीहंडीच्या तयारी आणि नियोजनासाठी आढावा बैठक घेतली असून, युवाशक्तीचे सुमारे दीडशे कार्यकर्ते दहीहंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. दहीहंडीचा आनंद आणि थरार अनुभवण्यासाठी कोल्हापूर वासियांनी ७ सप्टेंबरला सायंकाळी ४ वाजता दसरा चौकात उपस्थित रहावे, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले आहे.