दिनांक ०२ ऑगस्ट २०२३:कोल्हापूर जिल्ह्यात केंद्र सरकारचे सुमारे १ लाख कर्मचारी काम करतात. याशिवाय कोल्हापूरमध्ये प्रादेशिक सैन्य दलाची बटालियन आहे. अशावेळी कोल्हापुरात केंद्रीय विद्यालयाची सुरवात करावी, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत केली. सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु असून, अधिवेशनात खासदार महाडिक यांनी विकासाच्या अनेक मुद्यांकडे लक्ष वेधले आहे. नवी दिल्लीत सुरु असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात खासदार धनंजय महाडिक यांनी सक्रीय सहभाग घेतला आहे. विविध विषयांना आणि मुद्यांना वाचा फोडून, खासदार महाडिक यांनी कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचा प्रयत्न कायम ठेवला आहे.
आज खासदार महाडिक यांनी राज्यसभेत बोलताना, कोल्हापुरात केंद्रीय विद्यालय सुरु करण्याची मागणी केली. कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर आहे. कोल्हापुरात सुमारे १ लाखांपेक्षा अधिक केंद्रीय कर्मचारी काम करतात. तर कोल्हापुरात सैन्याची एक प्रादेशिक बटालियनसुध्दा आहे. केंद्रीय विद्यालयाने शिक्षण क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा निर्माण केलाय. बेळगाव आणि पुणे या ठिकाणी केंद्रीय विद्यालये आहेत. त्याच पध्दतीने कोल्हापुरातही केंद्रीय विद्यालय सुरु करावे, अशी आग्रही मागणी खासदार महाडिक यांनी केली. त्याला केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मंेद्र प्रधान यांनी उत्तर दिले. केंद्रीय विद्यालय सुरु करण्यासाठी एक विशिष्ट प्रणाली असून, कोल्हापुरात केंद्रीय विद्यालय सुरु करण्याबद्दल योग्य प्रस्ताव आल्यास त्यावर सकारात्मक निर्णय घेऊ, असे सांगण्यात आले.