कोल्हापूर दि 26
जन्मावे कुठेही पण मरावे कोल्हापुरात असे आपण कोल्हापूरकर छातीठोकपणे संपूर्ण जगाला सांगत असतो.कारणही तितकंच प्रबळ आहे ते म्हणजे मृत्यूनंतर सुद्धा कोल्हापुरात अगदी मोफत आणि लाकूड शेणी च्या माध्यमातून शिस्तबद्ध अंत्यसंस्कार!
परंतु कालच कोल्हापुरातील पाचगाव परिसरामध्ये एक दुर्दैवी घटना घडल्याने कोल्हापूरच्या माणुसकीला काळिमा फासला गेला आहे.एका भाड्याच्या घरात आई व मुलगा राहत होते. त्यामध्ये राहणाऱ्या युवक मुलाचा कावीळ मुळे मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह घरापर्यंत आणला घराजवळ सर्व नातेवाईक दुःखात प्रेताची वाट बघत होते.तेवढ्यात ऍम्ब्युलन्स आली आणि प्रेत उतरून घरात नेत असताना संबंधित भाडेकरूच्या घरमालकाने प्रेत घरात नेऊ दिले नाही.इतकेच काय तर प्रेत खाली उतरू दिले नाही.त्यामुळे रितिरिवाजप्रमाणे त्या प्रेताला शेवटची अंघोळ घालणे,प्रेत बांधून तिरडीवर ठेवणे या सगळ्या गोष्टी केवळ अशक्य होऊन बसल्या. तरीसुद्धा आजूबाजूच्या नागरिकांनी त्या घरमालकाची समजूत काढायचा प्रयत्न केला.मग त्याने फक्त बेड वर प्रेत बसविणेबाबत सूचना केली.त्यासाठी नातेवाईक तयार होईनात.पण तरीही त्या घरमालकाने विरोध केला.शेवटी आंघोळ न घालता कशीबशी केवळ ओवाळणी करून तसेच प्रेत स्मशानभूमीत नेऊन तिथेच तिरडी बांधून चार खांदेकरी देऊन प्रेतावर अंत्यसंस्कार केले गेले.अश्या प्रकारची मानसिकता कोल्हापूरकारांची असू शकेल का?आपला मुलगा वारलेल्या त्या आईची काय अवस्था झाली असेल?माणुसकीला काळिमा फासणारी ही दुर्दैवी घटना घडल्याने कोल्हापूरकरांच्या कडून कमालीचा संताप व्यक्त होत आहे.