खासदार डॉ.श्रीकांत शिंदें समोर नियोजीत आराखड्याचे सादरीकरण
कोल्हापूर दि.17 : कोल्हापूर शहर हे कलानगरीसह क्रीडानगरी आणि कुस्तीपंढरी बरोबरच “फुटबॉल पंढरी” म्हणून संबोधले जाते. कोल्हापूर शहरातील फुटबॉल खेळास सुमारे १०० वर्षांची परंपरा लाभली आहे. स्वातंत्र पूर्व काळापासून कोल्हापूरमध्ये फुटबॉल खेळला जात असून, स्वातंत्र पूर्व काळातील अनेक फुटबॉल संघ शहरात आहेत. असा हा फुटबॉल खेळ कोल्हापूरची जीवनवाहिनी असून, देशात कोलकत्ता नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा प्रेक्षकवर्गही कोल्हापुरच आहे. परंतु, सुसज्ज मैदान, तंत्रशुद्ध प्रशिक्षण या अभावी कोल्हापूरसह आसपासच्या भागातील फुटबॉल खेळाडूंच्या प्रशिक्षणावर आणि खेळावर मर्यादा येत आहेत. यामुळे अनेक फुटबॉलपट्टू स्थानिक संघासहपुरते मर्यादित राहिले आहेत. तर ठराविक खेळाडू पुणे, मुंबई, गोवा, कलकत्ता आदी ठिकाणच्या नामांकित क्लब कडून खेळत आहेत. या खेळाडूंना कोल्हापुरातच सुसज्ज मैदान आणि तंत्रशुद्ध प्रशिक्षण प्राप्त होण्यासाठी फुटबॉल अॅकॅडमी होणे आवश्यक आहे. त्यानुसार शेंडा पार्क येथे उपलब्ध असलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २५० एकर जागेतील २० एकर जागेत फुटबॉल अॅकॅडमी आराखडा तयार करण्यात आला असून, त्यास निधी मंजूर करण्याची मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. याअनुषंगाने मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश नगरविकास विभाग २ चे प्रधान सचिव श्री.ब्रिजेश सिंह यांना दिले आहे. याबाबत जिल्हाप्रशासनाने सदर आराखडा सादर करण्याची प्रक्रिया गतिमान केली आहे.
तीन महिन्यांपूर्वी खासदार श्री.श्रीकांत शिंदे हे राजेश चषक फुटबॉल स्पर्धेच्या सामन्याला उपस्थित होते. यावेळी खासदार श्री.श्रीकांत शिंदे यांनी कोल्हापुरात फुटबॉल अॅकॅडमी स्थापन करण्याबाबत प्रयत्न करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार राज्य नियोजन मंडळाचे कार्यकरी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्ध आर्किटेक्ट श्री.अमर तेंडूलकर यांचेकडून फुटबॉल अॅकॅडमी आराखडा तयार करून घेतला आहे. यामध्ये ऑलिम्पिक साईज फुटबॉल मैदान, खेळाडूंचे वसतिगृह, प्रशिक्षक, संरक्षक, सुरक्षा रक्षक यांची स्वतंत्र व्यवस्था, चेजिंग रूम, गेस्ट हॉल, वाहनतळ, दोन टर्फ मैदान, दोन टेनिस कोर्ट, स्विमिंग टँक, बॉक्स क्रिकेट ग्राउंड, हॉल, जिम, गादरिंग हॉल आदी सुविधा उपलब्ध आहेत. सदर आराखड्याचे सादरीकरण काल पन्हाळा पावनखिंड मोहिमेसाठी कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचेसमोर करण्यात आले.
यावेळी माहिती देताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, फुटबॉल खेळ कोल्हापूरवासीयांच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. येथे स्थानिक स्पर्धांना मिळणारा प्रेक्षक वर्गाचा प्रतिसाद हजारोंच्या संख्येत आहे. गेल्या काही वर्षात कोल्हापूर शहरात आय लीग सारख्या स्तरावरील स्पर्धाही पार पडल्या आहेत. कोल्हापूरच्या अनेक फुटबॉलपट्टूनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले असून, गतवर्षी कोल्हापुरातील अनिकेत जाधवची भारतीय फुटबॉल संघात निवड झाली आहे. फुटबॉल खेळाला गती मिळावी. सुसज्ज मैदान, खेलासंबंधातील तंत्रशुद्ध प्रशिक्षक, इतर सोई-सुविधा खेळाडूंना प्राप्त व्हाव्यात याकरिता शहरात फुटबॉल अॅकॅडमी स्थापन करणे गरजेचे आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांची भेट घेतली असून मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेबांनी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश नगरविकास विभाग २ चे प्रधान सचिव श्री.ब्रिजेश सिंह यांना दिले असल्याचे सांगितले.
यावर खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी, कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे साहेब कटीबद्ध असून, फुटबॉल अॅकॅडमीची संकल्पना अत्यंत चांगली आहे. जिल्हा प्रशासनाने या आराखड्याच्या अनुषंगाने शासनाकडे नियोजित प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना देत फुटबॉल अॅकॅडमीसाठी आवश्यक निधी देवू, असे सांगितले.
यावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, आर्किटेक्ट अमर तेंडूलकर, कोल्हापूर हातकणंगले लोकसभा युवासेना अध्यक्ष ऋतुराज क्षीरसागर, युवा सेना जिल्हा संपर्क अधिकारी प्रसाद चव्हाण आदी उपस्थित होते.
प्रती,
मा. संपादकसो,
दै.
तरी वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिक, वृत्तवाहिनी, वेब पोर्टल वर प्रसिद्ध करून सहकार्य करावे. हि विनंती.
आपला,
नंदू सुतार, कार्यालय प्रमुख, शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, कोल्हापूर