कोल्हापूर दिनांक:१४ पश्चिम महाराष्ट्रात आधुनिकतेची कास धरुन संशोधनासह कार्यरत अनंत प्लास्टीक सर्जरी सेंटर १० व्या वर्षात प्रवेश करत आहे या निमित्ताने संकटग्रस्त रुग्णाना, त्यांचा जीव अथवा त्यांचे तुटलेले हात – पाय – बोटे वाचवण्याच्या दृष्टीने समयोचित मार्गदर्शन करणाऱ्या समाजातील देवदूतांचा गौरव करण्यासाठी आणि त्यांचे उदाहरण संपूर्ण समाजासमोर ठेवण्यासाठीचा एक प्रयत्न म्हणून रविवार, दिनांक १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता रेसिडन्सी क्लब नागाळा पार्क येथे एक स्नेह मेळावा आयोजित केला आहे. जगभरातील प्लास्टीक सर्जन प्रत्येक वर्षी १५ जुलै हा दिवस वर्ल्ड प्लास्टिक सर्जरी डे म्हणून विविध उपक्रमाद्वारे साजरा करतात. याचे औचित्य साधून रविवारी हा सोहळा संपन्न होत आहे यावेळी जगप्रसिद्ध सवाई मानसिंग वैद्यकीय महाविद्यालय, जयपूर येथील माजी विभागप्रमुख आणि ज्येष्ठ प्लास्टीक सर्जन डॉक्टर प्रदीप गोईल हे विशेष मार्गदर्शन करणार आहेत. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर किरण दोशी हे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत. अशी माहिती कोल्हापुरातील अनंत प्लास्टिक सर्जरी सेंटर चे संचालक आणि प्रमुख प्लास्टिक सर्जन डॉक्टर मयूरेश देशपांडे यांनी दिली .
प्राचीन काळापासून सुश्रुत ऋषिना प्लास्टीक सर्जरीचे जनक मानले जाते. त्यानी शल्यचिकित्सेचा पुरस्कार प्रामुख्याने शरीराचा कायापालट करण्यासाठी केला. पुरातन काळात युद्धात जायबंदी झालेल्या सैनिकांचे व्यंग निवारण करण्यासाठी तसेच चेहऱ्यावर झालेल्या जखमा, शस्त्राचे वार झाल्यामुळे विद्रूप झालेले नाक – कान, तसेच तुटलेली बोटे- हात- पाय अथवा इतर अवयव यांचे पुनर्ररोपण करण्याच्या दृष्टीने तसचे पुढे जाऊन बरेच दिवस न भरून येणाऱ्या जखमांचे उपचार करण्यासाठी शल्यचिकीत्सा ही शाखा विशेष विकसित केली. त्यासाठी त्यांनी जवळपास ३०० शस्त्रक्रिया तंत्रे आणि १२५ पेक्षा जास्त शस्त्रक्रिया आयुधांचा शोध लावला. काळाच्या ओघात या तंत्राच्या यशस्वीतेमुळे जन्मजात व्यंगाच्या दुरुस्तीसाठी देखील शल्यचिकित्सेचे निर्विवाद महत्व ठळकपणाने सिद्ध झाले.
मात्र याच काळात झालेल्या परकीय आक्रमणामुळे मुळची भारतीयांची मक्तेदारी असलेली ही कला ब्रिटिश, फ्रेंच व पोर्तुगीज लोकानी विशेषत: सौंदर्य उपचारांसाठी विकसित केली. आणि इंग्रजी भाषेप्रमाणे याचे नामकरण प्लास्टीक सर्जरी असे झाले.
त्याचा उपयोग खास करून फिल्म इंडस्ट्रीमधील सेलेब्रेटीजनी आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनविण्यासाठी केला. त्यामुळे साहजिकच अशा शस्त्रक्रियांचे मूल्य सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर गेले.