कोल्हापूर दि 10कोल्हापूर जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होत आहे. जिल्ह्यातील गगनबावडा, शाहुवाडी आणि भुदरगड, राधानगरी तालुका सोडून अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. जुलै महिना सुरू होऊन दहा दिवस झाले तरी कोल्हापूरमध्ये दमदार पाऊस झालेला नाही. जी पावसाची रिपरिप सुरू आहे त्यामुळे कोणताही परिणाम होत नसून अतिशय संथ गतीने धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात फक्त राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा या तीन तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरासह उर्वरित जिल्ह्यात परिस्थिती काहीशी चिंताजनक आहे. कोल्हापूर शहरासह, करवीर, हातकणंगले, कागल, शिरोळ या तालुक्यांमध्ये अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पन्हाळा, चंदगड आणि आजरा, गडहिंग्लज तालुक्यात काहीसा समाधानकारक पाऊस झाला आहे.
कोल्हापूर धरणांची स्थिती चिंताजनक
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण छोटे-मोठे मिळून 15 धरणे आहेत. यामधील केवळ चंदगड तालुक्यातील घटप्रभा आणि गगनबावडा तालुक्यातील कोदे धरणाचा अपवाद सोडल्यास सर्वच धरणांची पाणीपातळी खालावली आहे. केवळ घटप्रभा आणि कोदे लघू प्रकल्प भरला आहे. उर्वरित 11 धरणांमध्ये सरासरी 35 टक्केच्या आसपास पाणीसाठा आहे. काळम्मावाडी धरणात केवळ 14.65 टक्के पाणीसाठा आहे.