कोल्हापूर, ०८ : सद्यस्थिती शाळा, महाविद्यालयांच्या प्रवेश प्रकिया सुरु आहेत. प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांना विविध दाखले, प्रमाणपत्र अनिवार्य असतात. सदर दाखले, प्रमाणपत्र मागणी करण्याकरिता शिधापत्रिकेची आवश्यकता असते, तसेच शासनाच्या वैद्यकीय योजनांसह इतर योजनांचा लाभ घेण्यासाठीही शिधापत्रिकेची आवश्यकता असते. सद्यस्थितीत शासनाने सर्व शिधापत्रिकाधारकांना ऑनलाईन शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सुचना दिल्या आहेत. परंतु, ऑनलाईन शिधापत्रिकेसाठी अर्ज करताना अनेक तांत्रिक त्रुटी निर्माण होत आहेत. यामुळे शिधापत्रिकाधारकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे ऑनलाईन शिधापत्रिका प्रक्रिया सुरळीत होईपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारून नागरिकांना तात्काळ शिधापत्रिका उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती मोहिनी चव्हाण यांना दिल्या. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथे शिधापत्रिका प्रकियेत असलेल्या त्रुटी, संभाव्य पूरस्थिती काळातील धान्य पुरवठा यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी, महा-ई सेवा केंद्रधारकांची बैठक पार पडली.
बैठकीच्या सुरवातीस श्री.राजेश क्षीरसागर यांनी शिधापत्रिका प्रक्रीयेसंदर्भात असणाऱ्या तक्रारींचा आढावा घेतला. यामध्ये प्रामुख्याने ऑनलाईन सेवेमध्ये अनेक त्रुटी येत आहेत. जात पोट जात या रकान्यामध्ये इतर जातींचा समावेश नसल्याने ऑनलाईन फॉर्म जमा होत नाहीत. यामुळे शैक्षणिक प्रवेशासह वैद्यकीय सुविधांचा लाभ नागरिकांना घेता येत नाही. यासह पुरवठा विभागात अधिकारी वर्ग कमी असल्याने सही अभावी अनेक शिधापत्रिकांतील दुरुस्ती, नाव नोंदणी, नाव कमी करणे आदी कामे प्रलंबित पडली आहेत, अशा सूचना प्रामुख्याने नागरिकांनी मांडल्या.
याबाबत माहिती देताना जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती मोहिनी चव्हाण यांनी, शासनाकडून शिधापत्रिकेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. याकरिता वापरण्यात येणाऱ्या अप्लिकेशन मध्ये काही त्रुटी असल्याचे निदर्शनास आले असून, या त्रुटी सुधारण्याबाबत शासनास कळविले असल्याचे सांगितले. यासह महाराष्ट्र शासनाने सुधारित आकृतिबंध केल्यामुळे कर्मचारी वर्ग कमी असल्याचे सांगितले. यावर श्री.राजेश क्षीरसागर यांनी तात्काळ जिल्हाधिकारी श्री.राहुल रेखावार यांच्याशी संपर्क साधून जिल्हा पुरवठा विभागास आवश्यक अधिकारी व कर्मचारी वर्ग नियुक्ती करणेसंदर्भात चर्चा केली. त्यानुसार जिल्हाधिकारी श्री.राहुल रेखावार यांनी तात्काळ आवश्यक कर्मचारी वर्ग देण्यास समंती दर्शविली. त्याचबरोबर ऑनलाईन शिधापत्रिका प्रक्रिया सुरळीत होईपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारावेत. ऑनलाईन प्रक्रीयेसाठी तयार केलेल्या अप्लिकेशनच्या वापराबाबत सर्वच महा-ई सेवा केंद्र धारकांना प्रशिक्षण द्यावे, अशा सूचना श्री.राजेश क्षीरसागर यांनी जिल्हापुरवठा अधिकारी श्रीमती मोहिनी चव्हाण यांना दिल्या.
यानंतर बोलताना श्री.राजेश क्षीरसागर यांनी, शिधापत्रिकेवर नागरिकांना मिळणारा धान्य पुरवठा सुरळीत आहे का? रेशन धान्याचा काळाबाजार होत असल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. यावर पुरवठा विभागाचे नियंत्रण आहे काय? आगामी संभाव्य पूरस्थितीमध्ये रेशन धान्याअभावी नागरिकांची गैरसोय होऊ नये, याबाबत खबरदारी घ्यावी अशा सूचना केल्या. याबाबत माहिती देताना श्रीमती चव्हाण यांनी, सर्वच तालुका स्तरावर पुरवठा निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना तालुक्यातील रास्त भाव रेशन दुकानांची तपासणी करण्याचे लक्ष देण्यात आले असल्याचे सांगितले.
या बैठकीस शिवसेना शहर समन्वयक सुनील जाधव, अन्न धान्य वितरण अधिकारी श्रीमती प्रज्ञा कांबळे, लिपिक बाबासाहेब कणसे, निशिकांत माने, महा-ई सेवा केंद्र धारक धनंजय पाटील, श्रीमती पूजा भोसले, इरशाद मुल्ला आदी उपस्थित होते.
प्रती,
मा. संपादकसो,
वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिक, वृत्तवाहिनी, वेब पोर्टल वर प्रसिद्ध करून सहकार्य करावे. हि विनंती.
आपला,
नंदू सुतार, कार्यालय प्रमुख, शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, कोल्हापूर