दिनांक २७ ; स्थानिक शालेय मुलांचे कौशल्य निर्माण करणे आणि स्थानिक कौशल्यविकासासाठी प्रोत्साहन देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या पाठिंब्याने सुरू करण्यात आलेल्या हा उपक्रम
कोल्हापूर, ता. २७ जून २०२३: स्थानिक पाताळीवरील शालेय विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी पॉटर्स अर्थ फाउंडेशन आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने उज्ज्वल भविष्य हा एक अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत एका भव्य कार्यक्रमात हा अनोखा उपक्रम दाखल करण्यात आला. या माध्यमातून या मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्याच्या आणि स्थानिक बुद्धिमत्तेला संधी देण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.
या उपक्रमाचे उद्घाटन हातकणंगलेचे खासदार धैर्यशील संभाजीराव माने यांच्या हस्ते करण्यात आले. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजयसिंह चव्हाण, जिल्हा प्रशासनाचे माननीय सदस्य आणि विभागातील विविध औद्योगिक वसाहतींचे (एमआयडीसी) प्रतिनिधी यांच्यासह प्रमुख अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. कागल-हातकणंगले मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री हरिश्चंद्र धोत्रे, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (गोशिमा) अध्यक्ष श्री दीपक चोरगे आणि शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री दीपक पाटील आदी मान्यवरही यावेळी उपस्थित होते.सर्वांचे स्वागत पॉटर्स अर्थ फाउंडेशनच्या अनामिका दासगुप्ता यांनी केले.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पन्हाळा, शाहूवाडी आणि हातकणंगले तालुक्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या परिसरातील स्थानिक पातळीवरील प्रचंड क्षमता आणि प्रतिभा ओळखून स्थलांतरापासून तरुण पिढीला रोखणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. प्रतिभासमृद्ध असलेल्या या भागातील तरुण पिढी चांगल्या संधींच्या शोधात बाहेर जात असल्याने ब्रेन ड्रेनचा धोका वाढला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक प्रतिभावान तरुणांना स्वयंविकासासाठी आवश्यक कौशल्ये प्रदान करण्यासह मार्गदर्शन केले जाणार आहे.यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने म्हणाले, “कोल्हापूरच्या दीर्घकालीन शाश्वत आर्थिक विकासासाठी भक्कम गुंतवणूक केली जात असल्याने, उज्ज्वल भविष्य हा प्रकल्प क्रांतीकारी ठरेल, असा माझा ठाम विश्वास आहे. यामुळे स्थानिक पातळीवरील बुद्धीमत्ता, कौशल्य यांना संधी मिळेल. त्यांना सक्षम बनवण्यासाठी एकत्र येऊया.”
“या उज्ज्वल भविष्य प्रकल्पाची संकल्पना पॉटर्स अर्थ फाउंडेशनची आहे. ही एक सामाजिक संस्था असून, ती देशात शिक्षण ते रोजगार निर्मितीसाठी मोलाचे कार्य करत आहे” असे पॉटर्स अर्थ फाऊंडेशनचे संचालक सौरभ शर्मा यांनी सांगितले.