भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि. 21 (जिमाका): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त
समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने सामाजिक न्याय पर्व अभियान अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात
येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा
याबाबत समाजामध्ये जाणीव जागृती होण्याबाबत, या अधिनियमाबाबत व अंधश्रध्दा निर्मूलन कायद्याविषयी
जनजागृती होण्यासाठी वडणगे ता.करवीर येथील स्मशानभूमीमध्ये याबाबत जनजागृती करण्याचे आयोजन
प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमास गावकरी व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची
माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली.
प्रास्ताविकामध्ये सरपंच संगिता शहाजी पाटील यांनी हा कार्यक्रम वडणगे स्मशानभूमीत घेण्याचे
महत्वकांशी पाऊल उचलल्याबद्दल, सहायक आयुक्त विशाल लोंढे, उपसरपंच, ग्रामसेवक श्री. भगत व इतर सदस्य
व ग्रामस्थांचे आभार मानले.
राजर्षी शाहू महाराज यांनी अनेक अनिष्ठ रुढी, परंपरांना मुठ माती दिली व समाजामध्ये याबाबत
प्रबोधन व्हावे याकरीता मोफत शिक्षणास प्राधान्य दिले. राजर्षी शाहू महाराज त्यांच्या राजवाडयावरुन सोनतळी
या ठिकाणी जाण्या-येण्याचा मार्ग याच स्मशानभुमी मार्गावरुन होता. आज सामाजिक न्याय विभागाने व
ग्रामपंचायत वडणगे यांनी “स्मशानातील अमावस्येची विज्ञानमय रात्र ” या अंधश्रध्दा निर्मुलन कार्यक्रमचे नियोजन
करुन राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन केले असल्याचे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे जिल्हा
अध्यक्ष प्राचार्य विलास पवार यांनी मांडले.
कार्यक्रमाच्या माध्यमामधुन नागरीकांना, विद्यार्थ्यांना अंधश्रध्दा या विषयावर माहिती व्हावी तसेच
अंधश्रध्दा निर्मूलन, बुवाबाजी, जादुटोणा याविषयावर महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष
बाळासो मुल्ला यांच्यामार्फत प्रबोधन करण्यात आले.
खगोल अभ्यासक किरण गवळी यांच्याकडून अवकाशातील ग्रह, तारे, राशी, नक्षत्र आदींची ओळख व
खगोल शास्त्र, भूगोल शास्त्र, विज्ञानाबाबत सोप्या शब्दामध्ये पॉवर पॉईट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून माहिती
देण्यात आली. तसेच गॅलिलिओने लावलेल्या दुर्बिणीचा शोध व कालांतराने त्यामध्ये झालेला बदल याबाबत
माहिती दिली. त्यानंतर काळोख्या अंधारात अवकाश दर्शन घडवून या क्षेत्रातील गैरसमज दूर करुन विज्ञानवादी
होण्यासाठी प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.
यादव यांनी उपस्थित गावकरी व विद्यार्थ्यांना अंधश्रध्दा निर्मूलनाबाबत विनोदी शैलीतून मार्गदर्शन केले.
तसेच अंधश्रध्दा निर्मूलन कार्यकर्त्या श्रीमती सीमा पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन सचिन परब यांनी केले तर आभार वडणगेचे माजी उपसरपंच सयाजी घोरपडे यांनी मांडले. कार्यक्रम
यशस्वी करण्यासाठी समाजकल्याण निरिक्षक कल्पना पाटील, निलम गायकवाड, सुरेखा डवर, सविता शिर्के,
सचिन कांबळे तसेच वडणगे ग्रामपंचायतीचे कर्मचारी, तरुण मंडळे यांनी परिश्रम घेतले.