भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि. 21 (जिमाका) : राष्ट्रीय तृतीयपंथीय पोर्टलची जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीयांना माहिती
व्हावी व जास्तीत जास्त पात्र तृतीयपंथीयांनी ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळवण्यासाठी सोमवार दि. 24
एप्रिल 2023 रोजी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयामध्ये पोर्टलवर अर्ज भरण्यासाठी व ओळखपत्र
वितरीत करण्यासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचा जास्तीत जास्त तृतीयपंथीयांनी
लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव तथा समाज कल्याण विभागाचे
सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.
राज्यातील तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने राज्य स्तरावर
व विभागीय स्तरावर राज्यातील तृतीयपंथीय हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळ स्थापन करण्यास सामाजिक
न्याय व विशेष सहाय्य विभागाने मान्यता दिली आहे.
तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम 2019 मधील नियम 2020 अंतर्गत, विभाग 6 व 7 नुसार
जिल्हा स्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र अदा करण्याची तजविज आहे.
त्यानुषंगाने सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभाग, मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत राष्ट्रीय तृतीयपंथीय
पोर्टल सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पात्र तृतीयपंथीयांनी नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर परसन्स
या संकेतस्तळावर भेट देवून ॲप्लाय ऑनलाईनवर आपला युजरआयडी व पासवर्ड तयार करुन आपली सर्व
माहिती भरावी. तसेच ऑनलाईन अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
अधिक माहितीकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, समाजकल्याण कार्यालय, विचारे माळ,
बाबर हॉस्पीटल शेजारी कोल्हापूर संपर्क क्र. 0231-2651318 येथे संपर्क साधावा, असेही श्री. लोंढे यांनी
कळविले आहे.