भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि. 27 (जिमाका) : महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा),
राशिवडे बुद्रुक ता.राधानगरी येथे आयोजित जिल्हा कृषी महोत्सवाच्या दुसऱ्यां दिवशी विविध स्टॉलला
शेतकऱ्यांनी भेटी देऊन माहिती घेतली.
आज तालुक्यातील एकरी 60 टन ऊस उत्पादन घेणा-या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी
आनंदा दादु पाटील, अर्जुनवाड, सदाशिव जंगम, राशिवडे, आनंदा चौगुले, शिरोली, रमाकांत तोडकर, राशिवडे
यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला व यांना रु 25 हजार, 15 हजार, 10
हजार व 7 हजार शाल श्रीफळ आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली. दत्तात्रय पाटील, यळवडे, अशोक पाटील,
गुडाळ, दत्तात्रय पाटील, गुडाळ, शहाजी पाटील, कासारपुतळे, अवधूत पाटील, पडळी, धनाजी पाटील, तिटवे
यांचा प्रोत्साहनपर सत्कार करण्यात आला. कृषी यांत्रिकीकरण घटकांतर्गत रामचंद्र पाटील, पुंगाव, शांताबाई
पाटील, यळवडे, कल्पना पाटील, अतुल सुतार, संदीप साखळकर यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॅक्टर वितरित
करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आबीटकर यांनी मार्गदर्शन
केले. आत्मा संचालक दशरथ तांभाळे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. यशवंतराव
चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक डॉ. अधिकराव जाधव, कृषी पंडीत सुरेश देसाई, रेशीम
उद्योजक दीपक शेट्टी यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषी उपसंचालक रविंद्र पाठक यांनी आभार मानले.
जवळपास दोनशे स्टॉल्सच्या माध्यमातून यांत्रिकीकरण, विविध शासकीय विभागांकडील योजना, गृहोपयोगी
साहित्य, महिला बचत गटांची उत्पादने, खाद्यपदार्थ विक्री यांची रेलचेल प्रदर्शनात होत आहे.
कृषि प्रदर्शनाचे आकर्षण –
15 किलो वजनाचा फणस, पाच किलो वजनाचा कोबी, 8 किलो वजनाचा मुळा, साबुदाणा कंद, परदेशी
भाजीपाला, जातीवंत जनावरांसह पुंगनूर जातीची केवळ तीन फूट उंचीची गाय, दुर्मीळ होत चाललेल्या
माडग्याळ जातीचा मेंढा या गोष्टी प्रदर्शनातील आकर्षण ठरत आहेत. धान्य महोत्सवात आजरा घनसाळ, इंद्रायणी,
रत्नागिरी 24 तांदूळ, नाचणी, वरी, सेंद्रिय गूळ यांच्या खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. सायंकाळच्या सत्रात
विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.