भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि. 16 (जिमाका) : हातमाग कापड प्रदर्शनास कोल्हापूकरांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून
जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्पेशल हॅण्डलुम एक्सो प्रदर्शन
प्रमुख ज्ञानदेव बाभुळकर यांनी केले आहे.
वस्त्रोद्योग विभाग महाराष्ट्र शासनाचे प्रचार प्रसिद्धी योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ
नागपूरद्वारे व्ही. टी. पाटील स्मृती भवन, कमला कॉलेज परिसर, राजारामपूरी, मेन रोड, कोल्हापूर या ठिकाणी
स्पेशल हॅण्डलूम एक्स्पो २०२३ या नावाने हातमाग कापड प्रदर्शन व विक्रीचे आयोजन २२ मार्च २०२३ पर्यंत
करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. कांदबरी बलकवडे यांच्या हस्ते
फित कापून व दीप प्रज्वलन करुन करण्यात आले.
आयुक्त डॉ. बलकवडे म्हणाल्या, या प्रदर्शनास विविध जिल्ह्यातून आलेल्या विणकर कारागिरांनी
हातमागावर तयार केलेल्या कापडाची उत्पादने विक्रीस ठेवली असल्याने विणकर कारागिरांना रोजगाराच्या संधी
उपलब्ध करणे, त्यांच्या कापडाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी शहरात आयोजित या प्रदर्शनास
एकदा तरी भेट देवून कापड खरेदी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
विणकर सहकारी संस्थांनी तयार केलेले हातमागाच्या चादरी, टॉवेल, रुमाल, सतरंजी, पंचे, बेडसिट,
उशी कव्हर तसेच नैसर्गिक धागा व रेशीम कोसा धाग्यापासून व बांबू बनाना ब्लेडेड फॅब्रिक्स व साड्या विक्रीस
ठेवलेल्या आहेत. सर्व प्रकारचे हातमाग कापड खरेदीवर सहभागी संस्थांकडून २० टक्के सूट देण्यात येत आहे. प्रवेश
विनामूल्य असून प्रदर्शन दररोज सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. प्रत्यक्ष उत्पादकांकडून
वाजवी दरात खरेदी करण्याची संधी कोल्हापूर शहरात एकाच ठिकाणी वस्त्रोद्योग विभागाचे माध्यमातून उपलब्ध
करून देण्यात आली आहे.
कोल्हापूरकरांनी एकदा तरी या प्रदर्शनाला अवश्य भेट देवून हातमागाचे कापड खरेदी करावे, असे
आवाहन सह व्यवस्थापकीय संचालक विजय निमजे, प्रदर्शन प्रमुख ज्ञानदेव बाभूळकर यांनी केले आहे. कार्यक्रमास
नंदकुमार तुळजापूकर व सहभागी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.