भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि. 15 (जिमाका) : जीवनात अशक्य असे काही नाही, मोठे होण्यासाठी मेहनत करा,
आपल्या क्षेत्रात तरबेज व्हा, आपल्या कलागुणांविषयी खरं बोला, प्रामाणिकपणे काम करा" असा सल्ला देवून
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी युवकांना शुभेच्छा दिल्या.
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय, पुणे व देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज
ऑफ कॉमर्स, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स येथे आयोजित
विभागीय रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार तसेच कौशल्य
विकास, रोजगार, उद्योजकता, विभागीय आयुक्तालयाच्या उपआयुक्त अनुपमा पवार व इतर मान्यवरांच्या हस्ते
रोपट्याला पाणी घालून करण्यात आले.
उप आयुक्त श्रीमती पवार यांनी उमेदवारांना आपल्या नैतिक जबाबदाऱ्या लक्षात घ्या. कोणतेही काम
लहान किंवा मोठे नाही, त्यामुळे मिळालेल्या संधीचा लाभ घेवून संघर्ष करा, अनुभव घ्या व मोठे व्हा, असा
सल्ला दिला.
यावेळी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी
विभागाच्या योजना व कौशल्य प्रशिक्षणाची गरज याबाबत मार्गदर्शन केले.
देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ.व्ही.ए.पाटील व विद्या प्रबोधिनी कोल्हापूरचे
अध्यक्ष राहुल चिकोडे यांनीही उमेदवारांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.
रोजगार मेळाव्यामध्ये औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील सुमारे १७ खासगी उद्योजकांनी सहभाग
नोंदविला. त्यांच्याकडून विविध प्रकारच्या सुमारे २८०० रिक्त पदांकरिता मुलाखती घेण्यात आल्या. मेळाव्यामध्ये
एकूण २४८ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यापैकी २४ उमेदवारांची अंतिम व १४७ उमेदवारांची
प्राथमिक निवड करण्यात आली. मेळाव्यास एकूण ७ महामंडळाचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते.
महामंडळांच्यावतीने उमेदवारांना कर्ज पुरवठ्याच्या योजनांची माहिती देण्यात आली.