भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर दि. 9 (जिमाका) : उपचारापेक्षा प्रतिबंध बरा या उक्तीप्रमाणे टी.बी. होऊच नये म्हणून
प्रतिबंधात्मक उपचार प्रणाली (टी.पी.टी.) दिल्यास भविष्यात टी.बी. होणार नाही. क्षयरोग प्रतिबंधात्मक
उपचार प्रणाली वापरुन 2025 पर्यंत कोल्हापूर जिल्हा क्षयरोग मुक्त करुया, असे आवाहन आरोग्य उपसंचालक
डॉ. प्रेमचंद कांबळे यांनी केले.
जिल्हा क्षयरोग केंद्रामार्फत आयोजित क्षयरोग प्रतिबंधात्मक उपचार प्रणाली (टी.पी.टी.)
प्रशिक्षणाच्या उद्धघाटन प्रसंगी ते बोलत होते. कणेरीवाडी येथे जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका
आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांचे एक दिवशीय प्रशिक्षण आयोजित केले होते. या कार्यशाळेस
जिल्ह्यातील 90 वैद्यकीय तज्ज्ञ उपस्थित होते. यावेळी सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिमेचे (८ ते २१ मार्च २०२३)
मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
डॉ. कांबळे म्हणाले, दर दिवशी १ हजार क्षयरुग्ण देशात सापडतात. क्षयरोग हा उपचार घेतल्यास पूर्ण
बरा होतो. टी.बी. झालेल्या रुग्णांना शासनातर्फे नियमित उपचार दिला जातो. टी.बी.चा उपचार घेण्यापेक्षा
प्रतिबंध करणे बरे आहे. क्षयरोग होऊ नये म्हणुन क्षयरोग प्रतिबंधक उपचारप्रणाली दिल्यास पुढील संभाव्य
धोका टळेल. त्यामुळे सर्व पात्र व्यक्तींनी प्रतिबंधात्मक उपचार प्रणाली (टी.पी.टी.)चा लाभ घ्यावा, असेही त्यांनी
सांगितले.
जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा कुंभार म्हणाल्या, सन २०२५ पर्यंत क्षयरोगाला भारतातून हद्दपार
करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुचनेनुसार केला आहे. याचाच एक भाग म्हणून क्षयरोग
प्रतिबंधात्मक उपचार प्रणालीची (टी.पी.टी.) अंमलबजावणी केली जात आहे. नॅशनल स्ट्रॅटेजीक प्लॅन २०१७-
२०२५ मधील एका महत्वाच्या निर्देशांकानुसार टी.बी. बाधित व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींना पुढे
होणारा संभाव्य टी.बी. चा धोका टाळण्यासाठी टी.बी. प्रिव्हेंटिव्ह थेरपी (टी.पी.टी.) म्हणजेच क्षयरोग
प्रतिबंधात्मक उपचार प्रणाली जिल्ह्यात सुरु केली जात आहे.
ज्या व्यक्तींना सक्रिय पॉझिटिव्ह क्षयरोग नाही पण क्षयरोगाचे जंतू शरीरात आहेत त्यास लेटन्ट टी.बी.
इन्फेक्शन (एल.टी.बी.आय.) म्हणजेच सुप्त क्षयरोग संसर्ग म्हणतात.यामध्ये त्यांचा छातीचा एक्स-रे, थुंकी
तपासणी निगेटीव्ह असते. त्यांना कोणताही त्रास नसतो. टी.बी. पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील सुप्त क्षयरोग
संसर्ग (एल.टी.बी.आय.) असलेल्या व्यक्ती मधुन पॉझिटिव्ह टी.बी. शोधून त्यास सक्रिय क्षयरोगाची उपचार
प्रणाली सुरु करणे, निगेटिव्ह असल्यास त्यास पुढे सक्रिय टी.बी. होऊ नये म्हणून इग्रा टेस्ट केली जाते. टेस्ट
केल्यानंतर जर इग्रा पॉझिटिव्ह आली पण एक्स-रे निगेटिव्ह आल्यास क्षयरोग प्रतिबंधात्मक उपचार (टी.पी.टी.)
देण्यात येते. पण एक्स-रे पॉझिटिव्ह आल्यास सक्रिय क्षयरोगाची (कॅट- १) उपचारप्रणाली सुरु केली जाते.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे म्हणाले, टी.बी. 'पॉझिटिव्ह' रुग्णाच्या घरातील संपर्कातील
रुग्णाबरोबरच हाय रिस्कमधील रुग्ण जसे एच.आय.व्ही. 'पॉझिटिव्ह' रुग्ण आणि डायलेसीसवरील रुग्ण, कॅन्सर
रुग्ण, अवयव बदललेले रुग्ण, किडनी संबंधित आजार असलेले रुग्ण अशा प्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांना
टी.बी. होण्याचा धोका जास्त आहे. अशा व्यक्तींना आयुष्यात टी.बी. आजार होण्याची शक्यता नॉर्मल व्यक्तीपेक्षा
५ ते २० पट अधिक असते. त्यांनी टी.बी. प्रतिबंधक उपचार (टी.पी.टी.) जरुर घ्यावी. तसेच एकदा औषधोपचार
सुरु केल्यानंतर काही अपवादात्मक परिस्थिती वगळता सहा महिने हा औषधोपचार अखंडित घ्यावा लागतो,
असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैद्यकीय अधिकारी डॉ. विनायक भोई यांनी केले. यावेळी जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा. कुंभार, निवासी वैद्यकीय अधिकारी (सी.पी.आर)
डॉ. हर्षला वेदक, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रणवीर, जागतिक आरोग्य सल्लागार डॉ. चेतन हांडे,
आय.जी.एम हॉस्पीटलचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपाली भाट, डॉ. भोई, डॉ.जेसिका अँड्रस व जिल्ह्यातील सर्व
वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सर्व एन.टी. ई.पी.स्टाफ उपस्थित होते.
यावेळी वैद्यकीय तज्ज्ञांनी (टी.पी.टी.) चे प्रशिक्षण दिले