भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर, दि. 21 (जिमाका): स्वराज्याची संकल्पना शिवरायांनीच प्रथम मांडली. लोकशाही पद्धतीने
राज्यकारभार करणारा राजा अशी त्यांची जगात ओळख आहे. इतर धर्मियांचा आदर बाळगणे, स्त्रियांचा सन्मान
करणे आणि गरिबांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे हे शिवरायांच्या राज्यकारभाराचे वैशिष्ट्य होते.
म्हणूनच आजच्या लोकशाहीत देखील त्यांच्यासारखा एका लोककल्याणकारी राजाची आठवण केली जाते. त्यांच्या
सैन्यात अनेक जाती-धर्माचे आणि जीवाला जीव देणारी माणसं होती त्यांनी कधीही जातीवादाला थारा दिला
नाही उलट अठरापगड जातीतल्या लोकांना सोबत घेऊनच शिवाजीराजांनी आपले स्वराज्याची स्वप्न पूर्ण केले,
असे विचार समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती
निमित्त आयोजित अभिवादनाच्या कार्यक्रमात केले.
या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन राज्यगीत “जय जय
महाराष्ट्र माझा” या गीताचे सामुहिक गायन करण्यात आले. सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी व कर्मचारी
यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग नोंदवून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. सहाय्यक आयुक्त
समाज कल्याण कोल्हापूर यांच्या अधिनस्त असलेल्या शासकीय वसतिगृह, निवासी शाळा व आश्रम शाळा मधील
विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर व जीवन प्रसंगावर आधारित वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
करण्यात आले होते.
वक्तृत्व स्पर्धेमध्ये एकूण 46 विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. गारगोटी येथील डॉ. बाबासाहेब
आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृहातील चैतन्य कुंडलिक कांबळे याचा प्रथम, कसबा बावडा, मराठा कॉलनी
येथील मुलींचे शासकीय वसतिगृहातील कु.प्रज्ञा पांडुरंग कांबळे हिचा द्वितीय व तेरवाड येथील प्राथमिक
आश्रमशाळेतील तनाज आशपाक बेपारी तृतीय क्रमांक आला. विजेत्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र तसेच सहभागी
स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमासाठी दिनकरराव शिंदे स्कूल ऑफ सोशल वर्क मधील प्राध्यापक डॉ. उमेश वळवी, डॉ.
कालिंदी रानभरे यांनी परीक्षक म्हणून कामकाज पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन परब यांनी केले.
प्रास्ताविक दत्तात्रय पाटील यांनी केले तर आभार सचिन पाटील यांनी मांडले.
कार्यक्रमांमध्ये शासकीय निवासी शाळा, वसतिगृहे व विजाभज प्रवर्गातील आश्रम शाळेतील विद्यार्थी-
विदयार्थ्यींनी, गृहपाल, शिक्षक व इतर कर्मचारी तसेच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातील अरविंद
रंगापुरे, सचिन पाटील, प्रताप कांबळे, सुप्रिया काळे व कल्पना पाटील तसेच इतर अधिकारी-कर्मचारी मोठ्या
संख्येने सहभागी झाले होते.