भन्नाट न्युज नेटवर्क
कोल्हापूर दि. 17 : पर्यटनाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याची जागतिक पातळीवर वेगळी ओळख
निर्माण होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळे व पर्यटन विषयक बाबींवर
आधारित ‘विविधरंगी कोल्हापूर..!’ खुली छायाचित्र स्पर्धा 2023 आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा
सर्वांसाठी खुली असून निवड होणाऱ्या छायाचित्रांचा समावेश जिल्ह्याच्या कॉफी टेबल बुक (छायाचित्र पुस्तिका)
मध्ये छायाचित्रकारांच्या नावासह करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी छायाचित्र पाठविण्याची अंतिम मुदत 13 मार्च
2023 रोजी रात्री 12.00 पर्यंत राहिल. स्पर्धेची सविस्तर माहिती जिल्हा प्रशासनाच्या
www.kolhapur.gov.in या संकेतस्थळावर https://kolhapur.gov.in/en/notice/vividharangi-
kolhapur-photography-competition-2023/ येथे उपलब्ध आहे. कोल्हापूर जिल्ह्याची पर्यटनविषयक
आकर्षक छायाचित्रे जगासमोर यावीत व जगभरातील पर्यटकांनी कोल्हापूरला भेट द्यावी, यासाठी ही स्पर्धा
घेण्यात येत आहे. या स्पर्धेत अधिकाधिक संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार
यांनी केले आहे.
अंतिम निवड करण्यात आलेल्या प्रत्येक छायाचित्रासाठी 3 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असून
सर्वोत्कृष्ट छायाचित्रकारांना प्रथम पारितोषिक 51 हजार रुपये, व्दितीय पारितोषिक 35 हजार रुपये, तृतीय
पारितोषिक 21 हजार रुपये, दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी 15 हजार रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठीचे नियम व अटी खालीलप्रमाणे आहेत.
स्पर्धेमध्ये कोणीही व्यावसायिक किंवा हौशी छायाचित्रकार सहभागी होऊ शकतो. छायाचित्र सुस्पष्ट
असावे. अस्पष्ट छायाचित्रांचा स्पर्धेसाठी विचार केला जाणार नाही. सहभागी स्पर्धक प्रत्येक विषयावर जास्तीत-
जास्त 5 छायाचित्रे पाठवू शकतो. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपली छायाचित्रे जिल्हा प्रशासनाच्या
इन्स्टाग्राम #destinationkop #koptourism त्याचप्रमाणे फेसबुक पेज #koptourism #destinationKOP
ला टॅग करावे. तसेच आपल्या छायाचित्राच्या ठिकाण/विषयानुसार हॅशटॅग करणे बंधनकारक आहे. छायाचित्रे
केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील ठिकाणांची / विषयांची असणे बंधनकारक आहे.
प्रत्येक छायाचित्रास योग्य शीर्षक व थोडक्यात वर्णन कॅप्शन आवश्यक आहे. सर्व छायाचित्रे JPEG
format मध्ये असावीत. सदर स्पर्धेसाठी पाठविण्यात येणारी छायाचित्रे ही केवळ DSLR किंवा तत्सम
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कॅमेरा वापरुन स्वत: काढलेली असावीत. सर्व छायाचित्रे मूळ स्वरुपात असावीत.
कोणतेही छायाचित्र संकलन (एडिट) केलेले असू नये. फक्त क्रॉप करण्यास हरकत नाही. कोणत्याही छायाचित्राला
बॉर्डर, फ्रेम किंवा वॉटरमार्क देऊ नयेत. अशा प्रकारच्या छायाचित्रांना स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.
छायाचित्र स्वतः काढले असल्याचे प्रतिज्ञापत्र PDF फॉरमॅटमध्ये साध्या कागदावर सोबत पाठवावे. सदर
प्रतिज्ञापत्र व प्रवेश अर्ज सोबत जोडलेल्या विहीत नमुन्यानुसार पूर्ण भरुन सादर करणे बंधनकारक आहे. तसे
प्रतिज्ञापत्र सादर न केल्यास छायाचित्रांचा स्पर्धेसाठी विचार केला जाणार नाही. सदरील स्वाक्षरित प्रतिज्ञापत्र
vividhrangikolhapurphotos@gmail.com या मेल आयडीवर पाठवावे. छायाचित्राची निवड झाल्यानंतर ते
छायाचित्र मूळ साईजमध्ये vividhrangikolhapurphotos@gmail.com या ईमेल आयडीवर पाठविणे
बंधनकारक राहील. त्यासाठी समितीमार्फत संबंधितांशी स्वतंत्रपणे संपर्क साधण्यात येईल.
पुरस्कार प्राप्त छायाचित्रे कॉफी टेबल बुकसाठी छायाचित्रकाराच्या नावासह वापरली जातील. तसेच
जिल्ह्याच्या प्रसिध्दीसाठी विविध माध्यमांमध्ये वापरण्यात येतील. यासाठी कोणत्याही पूर्वपरवानगीची
आवश्यकता राहणार नाही.
बक्षीसाची रक्कम ही अहस्तांतरणीय असेल. छायाचित्रांच्या कॉपीराईट संदर्भात कायदेशीर बाबींसाठी
स्पर्धक स्वत: जबाबदार राहिल. छायाचित्रासंदर्भात कायदेशीर बाब निर्माण झाल्यास संबंधित छायाचित्र स्पर्धेतून
रद्द करण्यात येईल, असेही जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.